सह्याद्री कोविड सेंटरला 300 पीपीई किट; 'पी. डी. पाटील' संस्थेतर्फे लाखाचा धनादेश

सचिन शिंदे
Sunday, 20 September 2020

सह्याद्री साखर कारखान्यामार्फत सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे 100 साधे बेड आणि 50 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये कऱ्हाड उत्तरमधील बहुतांश रुग्णांची तेथे सोय होणार आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या 12 व्या पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय पी. डी. पाटील साहेब सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने सह्याद्री कारखाना कोविड सेंटरला 300 पीपीई किट खरेदीसाठी एक लाख दहा हजारांचा धनादेश संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र माने यांनी कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री साखर कारखान्यामार्फत सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे 100 साधे बेड आणि 50 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये कऱ्हाड उत्तरमधील बहुतांश रुग्णांची तेथे सोय होणार आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या पीपीई किट देण्यासाठी आदरणीय पी. डी. पाटील साहेब सहकारी पाणीपुरवठा संस्था पुढे आली आहे. 

'काडसिद्धेश्‍वर'मध्ये प्लाझ्मा थेरपीस प्रयत्न करू : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

संस्थेच्या वतीने 300 पीपीई किट सह्याद्री कोविड सेंटरला देण्यात येणार आहेत. त्यासाठीची एक लाख दहा हजारांचा धनादेश संस्थेचे उपाध्यक्ष माने यांनी श्री. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक सुरेशराव पवार, बाळासाहेब जाधव, मारुती घोरपडे, दीपक पवार, सुशीला पाटील उपस्थित होत्या. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने संस्थेने यापूर्वीही पंतप्रधान व मुख्यमंत्री कोविड साहाय्यता निधीस भरीव मदत केली आहे, तसेच 200 पीपीई किट ज्येष्ठ नेते पाटील यांच्या जयंतीदिनी शासनास दिली आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 PPE Kits To Sahyadri Covid Center In karad Satara News