#FridayMotivation : शेतीत राबणारा देवीदास झाला 45 व्या वर्षी तलाठी

संदीप रायपुरे 
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने त्यांनी काही दिवस मित्राकडील संगणकावर सरावही केला आणि मग परीक्षाही दिली. बरेच दिवस झाले तरी निकाल लागला नाही. आपली निवड होणार नाही, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि पुन्हा ते शेतीत राबायला लागले. मात्र, बुधवारी (ता.30) अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला गेला. देवीदास यावेळी शेतातच काम करीत होते. घरी मुलीने फोन उचलला. नंतर बाबाला सांगते असे कळविले. सायंकाळी देवीदास शेतातून परत आले. त्यांनी त्या नंबरवर फोन केल्यानंतर त्याला ही गोड बातमी समजली.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - कधी ओला तर कधी सुक्‍या दुष्काळाने बळीराजाचे कंबरडे मोडणे नित्याचेच झाले आहे. शेती करावी तरी कशी या चक्रव्यूहात तो पुरता अडकलेला असतो. अशात पंधरा वर्षे शेतीची कास धरणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने पुस्तकांशी मैत्री केली आणि यशही मिळविले. सातबारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारणारा हा शेतकरी आता स्वतःच इतरांना सातबारा देणार आहे. कारण तो तलाठी झालाय..! 

तरुणांना लाजवेल अशा संघर्षमय स्थितीत यशाची पायरी गाठणाऱ्या देवीदास तुकाराम ठेंगणे या शेतकऱ्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणेची शिदोरीच ठरली आहे. देवीदास ठेंगणे गोंडपिपरी तालुक्‍यातील नांदगाव येथील रहिवासी आहेत. 2003 मध्ये त्यांनी गोंडपिपरीच्या कला-वाणिज्य विद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एम.ए. केले.

नोकरीसाठी प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही. त्यांनी घरी असलेली शेती करण्याचा निर्णय घेतला. लग्नही केले. आपल्या शेतीत वर्षभर मेहनत ते घेऊ लागले. पुस्तकांची सोबत तर सुटलीच होती. आता केवळ शेती हा एकच विषय होता. 

पत्नी, मुलगा आणि मुलीसह ते शेती करीत संसाराचा गाढा पुढे रेटायचे. 2004 सालापासून शेती करणाऱ्या देवीदासला अनेकदा कधी ओल्या तर कधी सुक्‍या दुष्काळाचा मोठा फटका बसला. अगदी हातात येणारे पीक अनेकदा नष्ट झाले. अशात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने तलाठी पदाची जाहिरात काढली. यात अंशकालीन पदवीधर प्रवर्गासाठीही जागा होती. देवीदास यांनी अंशकालीन म्हणून काम केले होते. अंशकालीन साठीही खूप स्पर्धा असते.

त्यामुळे त्यांनी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. शेतीचा हंगाम सोडणे शक्‍य नव्हते. अशावेळी ते शेतात काम करीत वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचे. परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने त्यांनी काही दिवस मित्राकडील संगणकावर सरावही केला आणि मग परीक्षाही दिली. बरेच दिवस झाले तरी निकाल लागला नाही. आपली निवड होणार नाही, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि पुन्हा ते शेतीत राबायला लागले. मात्र, बुधवारी (ता.30) अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला गेला. देवीदास यावेळी शेतातच काम करीत होते. घरी मुलीने फोन उचलला. नंतर बाबाला सांगते असे कळविले. सायंकाळी देवीदास शेतातून परत आले. त्यांनी त्या नंबरवर फोन केल्यानंतर त्याला ही गोड बातमी समजली. 

दिवाळीच्या पर्वावर मेहनतीचे चीज झाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाच आनंद पसरला. देवीदास आता 45 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा प्रज्वल इयत्ता आठवीत तर मुलगी प्रणाली सहावीत शिकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the 45th of age Devidas became Talathi success motivation