लग्न साधेपणाने करून अभियानाला पाच लाखांची मदत

लग्न साधेपणाने करून अभियानाला पाच लाखांची मदत

पुणे - लग्नसोहळ्यात संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याची प्रथा पडलेली असताना भूगाव (ता. मुळशी) येथील संजय नामदेव पवार व कोये (ता. खेड) येथील शिल्पा गणपतराव राळे या उच्चशिक्षितांनी आपले लग्न साधेपणाने करून त्यातून वाचलेला पाच लाख रुपयांचा निधी राम नदी स्वच्छता अभियानाच्या भूजल पुनर्भरण कार्यक्रमासाठी दिला. त्यातून भुकूम, भूगाव आणि बावधन या गावांतील कूपनलिका आणि विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. 

सनदी लेखापाल (सीए) असणारा संजय हा राम नदी स्वच्छता अभियानातील सक्रिय सदस्य आहे. बंधू अनिल पवार यांच्यासह त्याचा नदीपात्रात स्वच्छता, परिक्रमा आणि जनजागृतीपर जलदिंडी आदी कार्यक्रमांत सहभाग असतो. त्याचा विवाह कोये येथील सनदी लेखापाल असलेल्या शिल्पा राळे हिच्याशी ठरला. या जोडप्याने लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून वाचलेली रक्कम राम नदी स्वच्छता अभियानासाठी देण्याचे ठरविले.

संजय आणि शिल्पा यांचा विवाह गुरुवारी (ता. १०) सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथे झाला. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पवार कुटुंबीयांनी छापली नाही. थेट फोनवरून निमंत्रणे दिली. सोहळ्यात पाहुण्यांचा सत्कारही केला नाही. संपूर्ण सोहळा साध्या पद्धतीने केला. त्यातून वाचलेले सुमारे पाच लाख रुपयांची मदत राम नदी स्वच्छता अभियानाच्या भूजल पुनर्भरण कार्यक्रमासाठी दिली. 

तलावांतील गाळही काढणार
राम नदी स्वच्छता अभियानाचे संस्थापक अनिल पवार यांनी सांगितले की, ‘कूपनलिका आणि विहिरींच्या पुनर्भरणाबरोबरच राम नदीच्या खोऱ्यातील भूगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय, खाटपेवाडी तलाव आणि चोंधे दरा तलाव येथील गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सर्व कामे शास्त्रीय पद्धतीने केली जाणार असून, भूजलविज्ञानात तज्ज्ञ असलेल्या पुण्यातील ॲक्वाडॅम या संस्थेचे मार्गदर्शन आणि मंथन अध्ययन केंद्राची मदत घेणार आहे.’ 

मी राम नदीच्या सहवासात वाढलो. शहरीकरणामुळे नदी प्रदूषित झाली आहे. प्लॅस्टिक, घनकचरा आणि सांडपाणी नदीपात्रात मिसळत आहे. नदीच्या खोऱ्यात भूगर्भातील  पाण्याचा अतिउपसा होऊन भूजल पातळी खालावलेली आहे. नदीत बारमाही वाहणारे झरे नष्ट होऊ लागले आहेत. माझ्या आर्थिक सहभागामुळे राम नदीच्या खोऱ्यातील गावांत कूपनलिका आणि विहिरींच्या पुनर्भरणाचे काम सुरू होत आहे, याचा मला आनंद आहे.
 - संजय पवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com