नृत्याने दिली आकाश, सूरजला नवी ओळख

जितेंद्र मैड
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पौड रस्ता - भंगार वेचक व सफाई कामगाराची मुले अशी ओळख असलेल्या आकाश आणि सूरज मोरे या दोन भावंडांनी दूरचित्रवाणी वाहिनीवरील डान्स शोमध्ये यश मिळवले आहे. नृत्याने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली आहे.  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

पौड रस्ता - भंगार वेचक व सफाई कामगाराची मुले अशी ओळख असलेल्या आकाश आणि सूरज मोरे या दोन भावंडांनी दूरचित्रवाणी वाहिनीवरील डान्स शोमध्ये यश मिळवले आहे. नृत्याने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली आहे.  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

कोथरूडमधील श्रीकृष्ण कॉलनी या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या दोन जुळ्या भावंडांनी दूरचित्रवाणीवर प्रसिद्ध होणाऱ्या एका डान्स शोमध्ये चौथा क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आकाश व सूरज मोरे यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. आई नंदा मोरे या महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. त्यांनी अतिशय कष्टातून आकाश व सूरजला आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलांनी मिळवलेल्या यशामुळे आता त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले आहेत. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे भंगार वेचणारी मुले अशी त्यांची ओळख पुसली जाऊन डान्स टीचर, डान्सर ही ओळख निर्माण झाली आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. त्यासाठी त्यांच्या मनाने आणि शरीराने अनेक घाव सोसले आहेत. त्या घावांना कुरवाळत बसण्यापेक्षा ध्येयाकडे वाटचाल करण्याकडे आकाश, सूरजने महत्त्व दिले.  त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.  याबाबत नंदा मोरे म्हणाल्या, की माझ्या मुलांचे कपडे घाण असल्यामुळे इतर मुले त्यांना जवळ करीत नव्हती. मुले भंगार विकून डान्स शिकली. नंतर त्यांचे कौशल्य पाहून बाकीच्यांनी त्यांना आपल्या सोबत डान्समध्ये सहभागी करून घेतले. आज ते नावाजलेले डान्सर झाले आहेत, त्यामुळे खूप आनंदी आहे.

आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. आम्हाला ओळख मिळवून देण्यामागे नृत्यशिक्षक आनंद पाटोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरतोय, हे ऐकून खूप छान वाटते. आता सेलिब्रेटीसारखी वागणूक मिळत आहे. सरोज खान यांनी दिलेले बक्षीस विसरू शकत नाही. 
- सूरज मोरे 

नृत्यात जे दाखवले ते आमचे जीवन होते. बॅक स्टेजला आम्ही जी मेहनत घेतो ती प्रत्यक्षात टीव्हीला दिसत नाही. एका दिवसात डान्स बसवावा लागतो. डान्स पूर्ण केला तरी ऐनवेळी बदलावा लागतो. यश सोपे नसते. पण मेहनत घेतली, तर यश मिळते, हे मात्र नक्की. जीवनात खूप अडचणी येत असतात. पण त्यावर मात करायची असते. 
- आकाश मोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aakash and suraj more dance show success motivation