एका अनाथालयात होती... कन्या एक गुणवान...

सुधाकर काशीद
सोमवार, 3 जून 2019

काही गोड गोंडस अनाथ मुले पाहून त्यांचा ऊर भरून आला; पण एका क्षणी एका मुलीवर त्यांचे लक्ष खिळले. अगदी काळी सावळी, गळ्याला कसला तरी जखमेचा व्रण असलेली ती मुलगीही टुकूटुकू सगळीकडे बघत होती. त्या दिवशी हे घरी परत आले. मूल दत्तक घ्यायचे जवळजवळ निश्‍चित झाले

कोल्हापूर - हे कोल्हापुरातले मोठे ऑटो पार्टस्‌चे व्यापारी. सुखी, संपन्न परिवार; पण अपत्यप्राप्तीत काही अडचणी येत होत्या. घरात मूल असावे ही अपेक्षा स्वस्थ बसू देत नव्हती. खूप प्रयत्न केले; पण अडचण यायचीच. मग साहजिकच त्यांनी ठरवले, अनाथ बालकाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे. त्यांनी बालकाश्रमाला भेट दिली.

काही गोड गोंडस अनाथ मुले पाहून त्यांचा ऊर भरून आला; पण एका क्षणी एका मुलीवर त्यांचे लक्ष खिळले. अगदी काळी सावळी, गळ्याला कसला तरी जखमेचा व्रण असलेली ती मुलगीही टुकूटुकू सगळीकडे बघत होती. त्या दिवशी हे घरी परत आले. मूल दत्तक घ्यायचे जवळजवळ निश्‍चित झालेच होते; पण यांच्या डोळ्यांसमोर ती इतरांपेक्षा वेगळी काळी सावळी मुलगीच वारंवार येत होती. आणि त्याबरोबर मनात एक विचारही येत होता. इतर गोरी गोमटी मुले कोणीही दत्तक घेतील; पण ही अशी काळी सावळी, सर्वसाधारण, हिला कोण दत्तक घेणार? या प्रश्‍नाने रात्रभर त्यांच्या मनात घर केले आणि सकाळी या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनीच मिळवले. ती मुलगी आपणच दत्तक घ्यायची, असे त्यांनी ठरवले. त्यांनी हा निर्णय काही स्नेह्यांना सांगितला आणि त्यांना वेड्यात काढेना, तो आळशी ठरू लागला. 

अनेकजणांनी अनाथ मूल दत्तक घ्यायचे आहे तर मुलगीऐवजी मुलगाच घ्यावा, असा आग्रह धरला. काहींनी मुलगीच घ्यायची आहे, तर जरा गोरी गोमटी तर घे असे सुचवले. काहींनी तर अनाथ मूल दत्तक घ्यायच्या भानगडीत पडू नकोस, असा थेट सल्ला दिला.

पण यांनी तीच मुलगी दत्तक घ्यायचा निर्णय पक्का केला. कागदपत्रांची पूर्तता केली. ती मुलगी ताब्यात घेतली. तिच्या गळ्यावर कसली तरी जखम होती. त्यामुळे वैद्यकीय उपचारांची सुरवात केली. ताराबाई पार्कातील त्यांच्या देखण्या बंगल्यात ती मुलगी वाढू लागली. सुरवातीचे काही दिवस ॲडजस्ट केले. आज १३ वर्षे झाली, ती मुलगी एकुलती एक लाडकी बनून त्यांच्या घरी आहे. इंग्लिश माध्यमाच्या शाळेत आहे. उत्तम इंग्रजी, मराठी, सिंधी बोलते. स्क्वॅश खेळते. पोहण्याच्या स्पर्धेत उतरते. खूप छान रांगोळी काढते, मेहंदी रेखाटते, ट्रेकिंग करते. घरात सर्वांशी मिळून मिसळून राहते. कधी कधी हट्ट करते, रुसते. थोड्या वेळाने आईबाबांच्या कुशीत स्वतःला झोकून देते.

ती अभ्यासात हुशार आहे. या आई बाबांच्या बरोबर चाळीस ते पन्नास वेळा विमान प्रवास केला आहे. सारा भारत तिने पाहिला आहे. हिला खूप मोठी करायची असा तिच्या आईबाबांचा संकल्प आहे. कारण एका तळ्यात होत बदके पिल्लू सुरेख... होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक या गीताचे बोल आणि त्यातले कुरूप वेडे पिल्लू म्हणजे राजहंस होता हे त्यांना पक्के माहित होते. 

अनाथ मुलगी दत्तक घेऊन मी व माझ्या पत्नीने फार मोठे उपकार केलेले नाहीत; पण जरूर एका अनाथ मुलीचे आई-बाप आम्ही झालो आहोत. रक्‍ताच्या नात्यापेक्षा घट्ट नाते तिच्याशी तयार झाले आहे. तीही त्या गुणांची आहे. परवाच आम्ही तिचा वाढदिवस जोरात साजरा केला. ही मुलगी राजहंस आहे, एवढंच आम्हाला माहीत आहे. 
- संजय, अंकिता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adopted girl from orphanage special story