शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्ती

अभिजित डाके
Monday, 23 November 2020

आटपाडी तालुक्यातील (जि. सांगली) गोमेवाडी हे चार हजार लोकवस्तीचे गाव. कायम दुष्काळी परिस्थिती असली तरी येथील शेतकऱ्यांनी कष्टाने  चांगल्या पद्धतीने शेती विकसित केली आहे.

गोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या माध्यमातून गावातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागल्या आहेत. संस्थेच्या माध्यमातून बचत गटासाठी पूरक उद्योग तसेच शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. गरजू विद्यार्थांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी संस्थेने चांगला पुढाकार घेतला आहे.

आटपाडी तालुक्यातील (जि. सांगली) गोमेवाडी हे चार हजार लोकवस्तीचे गाव. कायम दुष्काळी परिस्थिती असली तरी येथील शेतकऱ्यांनी कष्टाने  चांगल्या पद्धतीने शेती विकसित केली आहे. गावातील महिलांना सक्षम करणे, आर्थिक व्यवहारांचे प्रशिक्षण देण्याबरोबरीने कुटुंबाच्या प्रगतीचे ध्येय ठेवून २०१३ पासून ‘ग्रामीण स्री शक्ती’ या संस्थेने महिला तसेच ग्राम विकास कार्याला सुरुवात केली. सप्टेंबर २०१७ मध्ये संस्थेची नोंदणी सांगली जिल्हा धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्थेला झाली सुरुवात 
संस्थेच्या स्थापनेबाबत माहिती देताना संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा कुलकर्णी म्हणाल्या, की गावातील महिला विविध पारंपरिक कार्यक्रमात सहभागी होत असतात. या कार्यक्रमामध्ये सौ. नीलाताई देशपांडे यांची ओळख झाली. त्या भारतीय स्री शक्ती संघटनेमार्फत विविध ठिकाणी सामाजिक कार्य करतात. त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गावातील महिला एकत्र करून सक्षम करण्याचा निर्धार केला. त्यासाठी ‘ग्रामीण स्री शक्ती‘ ही संस्था स्थापन केली. गेल्या सात वर्षांपासून संस्था महिला आणि मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहोत. 

सध्या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून सौ. सुनेत्रा कुलकर्णी कार्यरत आहेत. याचबरोबरीने सौ. मनीषा देशपांडे (सचिव), सौ. लक्ष्मी शिंदे, सौ. स्मिता पोफळे, सौ. नीलाताई देशपांडे, सौ. वसुधा कुलकर्णी, सौ. अर्चना जगताप, सौ. सुवर्णा जावीर, सौ. गायत्री कुलकर्णी, सौ. वृषाली पंडित, श्रीमती पडळकर या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या आहेत.

हेही वाचा : कंत्राटी शेती : फायद्याची की शोषणाची?

महिलांना मिळाली नवी उमेद 
संस्थेने गाव परिसरातील  गरजू महिलांना एकत्र आणले. त्यांचे बचत गट स्थापन केले. संस्थेच्या माध्यमातून सध्या दहा महिला बचत गट कार्यरत आहेत. यामध्ये शंभर महिला सहभागी आहेत. महिलांना पूरक व्यवसायांची माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण तसेच सहलीचे नियोजन केले जाते. यामुळे महिलांना पूरक व्यवसाय करण्यासाठी योग्य दिशा मिळाली.  

‘सकाळ माध्यम समूहा’च्या प्रयत्नांतून प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या मार्फत आयोजित प्रशिक्षणामध्ये गावातील महिलांनी सहभाग घेतला. या माध्यमातून महिला शेतकरी बचत गटाची सुरुवात झाली आहे.  संस्थेच्या मार्फत महिलांना कापडी पिशव्या-पर्स शिलाई, सांडगे, पापड, कुरडई निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या पाच महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उत्पादनांची विक्री सुरू आहे.

हेही वाचा : ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन करणारी करार शेती

शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
गोमेवाडी गाव शिवारात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. याचबरोबरीने अलीकडे द्राक्ष लागवड वाढू लागली आहे. या फळबागांच्या मध्ये काम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. ऐन हंगामात कुशल मजूर मिळणे मुश्कील होते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने गावातील दोनशेहून अधिक महिलांना गावातील कुशल महिला मजुरांकडून डाळिंब आणि द्राक्ष शेतीतील कौशल्ये शिकविली आहेत. योग्य तांत्रिक प्रशिक्षणामुळे या महिला आता द्राक्ष काड्या तयार करणे, छाटणी, पेस्टिंग, डीपिंग यांसारखी कामे चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्यांच्या रोजगारातही चांगली वाढ झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून गावातील महिलांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाबाबत कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

ग्रामीण महिलांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करता आली पाहिजे. यादृष्टीने संस्था कार्यरत आहे. शेती विकासाच्या बरोबरीने पूरक व्यवसायासाठी मार्गदर्शन आम्ही करतो. यातून महिलांचा आर्थिक स्तर वाढतो आहे. महिलांना प्रशिक्षण तसेच मुलामुलींना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेच्या उपक्रमासाठी पुण्यातील सेवा सहयोग ही संस्था मदत करत असते.  
 ः सौ. सुनेत्रा कुलकर्णी, ९०९६४२५५४५. (अध्यक्षा, ग्रामीण स्त्री शक्ती संस्था)

आरोग्याचा जागर
ग्रामीण महिला, लहान मुलांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती केली जाते. दरवर्षी  आरोग्य शिबीर आयोजित केले जाते. त्यामध्ये महिलांसह मुलांच्या आरोग्याची तपासणी होते. किशोरी वयातील मुलींच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक विकासासाठी आरोग्यविषयक माहिती दिली जाते. सॅनिटरी पॅड्सची माहिती देऊन मुलींच्या शाळांतून पॅड्‌स बँक सुरू केली आहे. सध्या पाच शाळांमध्ये ही बॅंक प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून अन्य गावांत देखील हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सेंद्रिय शेतीला चालना 
ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाकडे शेती आहे. अलीकडे सेंद्रिय शेतीचा विचार सर्वत्र रुजू लागला आहे. त्यामुळे गावातील महिलांपर्यंत संस्थेने सेंद्रिय शेतीची माहिती पोहोचविण्यास सुरवात केली. यासाठी मेळावे घेतले. योग्य प्रशिक्षणामुळे गटातील महिलांनी प्रायोगिक तत्त्वावर एक ते दोन गुंठ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. निंबोळी अर्क, गांडूळ खत निर्मितीबाबत कृषी विभागाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या जागृतीमुळे गाव पसिरातील सुमारे चाळीसहून अधिक महिलांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आहे. भविष्यात शेतकरी महिला बचत गट आणि शेतकामगार महिला यांच्या संयुक्त सहभागाने सेंद्रिय शेती आणि उत्पादित शेतीमालाची विक्री करण्याचे संस्थेने नियोजन केले आहे. 

ग्राम विकासासाठी विविध उपक्रम 
संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी शेती मार्गदर्शन शिबिर, ग्रामस्थांसाठी आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती मेळावे आयोजित केले जातात. याचबरोबरीने मुलांचे शिक्षण, किशोर मुलामुलींचा विकास या विषयी जाणीव जागृतीचे कार्यक्रम गावामध्ये होतात. संस्थेच्या माध्यमातून होतकरू महिलांना आर्थिक बळ देण्यासाठीही विशेष मार्गदर्शन केले जाते. गावशिवारात डाळिंब, द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे. या बागायतीमधील सुधारित तंत्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अत्याधुनिक शेती, शिक्षण, आरोग्य, महिलांचे सबलीकरण या क्षेत्रातही संस्थेने चांगले काम केले आहे. गावातील महिलांना एकत्र आणून बचत गट स्थापन करण्यापासून ते ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. संस्थेच्या विविध उपक्रमातून महिलांना पीक व्यवस्थापन तंत्र, बॅंकेचे व्यवहार पोहोचत आहेत. यामुळे महिला सक्षमीकरण्यास मदत होऊ लागली आहे. 

संस्थेचे विविध उपक्रम
विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप.
शेती काम करणाऱ्या २५० हून अधिक महिलांना सुरक्षा संच वाटप.
शारदोत्सवामध्ये मुलांच्या बौद्धिक, शारीरिक क्रिडा स्पर्धांचे आयोजन. प्रोत्साहनपर मुलांना बक्षीस वाटप.
गावामध्ये दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम. 
ग्रामसभेत महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न.
अंगणवाडी शिक्षिका, आशा सदस्यांच्या मेळाव्यात सुरक्षा कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायद्याची माहिती, स्वतःच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जागृती.
जल, मृद्‌संवर्धनसाठी गावपातळीवर मेळावे.
लॉकडाउनच्या काळात गरजूंना धान्यवाटप.
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय.
दरवर्षी सीमेवरील सैनिकांना दोन हजार राख्यांची पाठवणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news Agriculture health and development of women power

Tags
टॉपिकस
Topic Tags: