प्रक्रिया उद्योगातून साधली आर्थिक प्रगती 

माणिक रासवे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

परभणी शहराच्या हडको भागातील सौ. वंदना सांवत यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन महिला स्वयंसाह्यता बचत गटाच्या माध्यमातून आवळा प्रक्रिया, मसाले निर्मिती गृहउद्योग सुरू केला. यामुळे गटातील महिलांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळाला. शेतकाम करणाऱ्या काही महिलांना हंगामी रोजगारदेखील उपलब्ध झाला.

परभणी शहरातील सौ. वंदना गोपाळराव सावंत यांनी बारावीनंतर मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी संपादन केली. गंगाखेड तालुक्यातील बडवणी हे त्यांचे सासर. सासरी त्यांच्या कुटुंबाच्या हिश्श्याची तीन एकर शेती आहे. या शेतीमध्ये ज्वारी, तूर, कारळा, मोहरीची लागवड असते. परंतु जिरायती शेती असल्यामुळे हमखास उत्पन्नाची शाश्वती नव्हती, त्यामुळे कुटुंबाच्या उदरर्निवाहासाठी उत्पन्नाचा पर्याय शोधणे आवश्यक होते. त्यामुळे २००१ मध्ये वंदना सावंत कुटुंबासह परभणी येथे स्थायिक झाल्या. त्यांचे पती नोकरी करतात. आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गृहउद्योग सुरू करावा असे त्यांना वाटत होते; परंतु आवश्यक भांडवल नव्हते. परभणी शहरात वास्तव्यास आल्यानंतर त्यांना महिला बचत गटांबद्दल माहिती मिळाली. सुरवातीला त्या एका महिला बचत गटामध्ये सहभागी झाल्या होत्या. परंतु या बचत गटाने फारशी प्रगती केली नाही.

 बचत गटाची केली उभारणी  
प्रक्रिया उद्योगाची माहिती घेताना वंदनाताईंची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांचे काम करणाऱ्या मीरा कराळे यांची भेट झाली. त्यांनी वंदनाताईंना बचत गटाचे महत्त्व समजावून सांगितले. विशिष्ट कालावधीत बचत केल्यास बॅंक महिला बचत गटास कर्ज देते. त्यातून एखादा गृहउद्योग सुरू करण्यासाठी भांडवल उभारता येते, अशी त्यांना माहिती मिळाली. वंदनाताईंनी पुढाकार घेऊन २६ सप्टेंबर २०१३ रोजी परिसरातील महिलांना एकत्र करून महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत ‘एकता महिला स्वयंसहायता बचत गट’ स्थापन केला. वंदनाताई बचत गटाच्या अध्यक्षा, तर पंचशीला भुजबळ सचिव आहेत. या गटात १७ महिला सहभागी झाल्या. बचत गटाच्या नावे बॅंक आॅफ बडोदामध्ये खाते उघडण्यात आले. त्यामध्ये दरमहा प्रति सदस्य १०० रुपये बचत होऊ लागली. गटाच्या नियमित बैठका होऊ लागल्या. २०१४ मध्ये गटाने पहिल्यांदा एका खासगी बॅंकेकडून एक लाख रुपये कर्ज घेतले. गटांतर्गत पैशांची देवाण-घेवाण झाली. ठरलेल्या मुदतीमध्ये कर्जाची परतफेडही करण्यात आली. बचत गटाने २०१५ मध्ये खासगी बॅंकेकडून दुसऱ्यांदा दोन लाख आठ हजार रुपये कर्ज घेतले. या कर्जातून वंदनाताईंसह गटातील महिलांनी प्रक्रिया उद्योग करण्याचे निश्चित केले. 

प्रक्रिया उद्योगासाठी घेतले प्रशिक्षण  
प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी बचत गटातील महिलांना प्रशिक्षणाची गरज होती. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राने उपजीविका घटक अंतर्गत गृहउद्योग सुरू करण्यासाठी एकता महिला स्वयंसहायता. गटातील १७ पैकी १३ महिला एकत्र आल्या. आता महिलांच्या गटास ‘संजीवनी उद्योग गट’ असे नाव देण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मन्सूर पटेल, सहायक जिल्हा समन्वयक नीता अंभोरे, नई रोशनी लोकसंचलित केंद्राच्या व्यवस्थापक जयश्री टेहरे, वर्षा मोरे, मीरा कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी आवळा प्रक्रिया, शेवया, मसाले, पापड निर्मिती गृहउद्योगाचे प्रशिक्षण घेतले. परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये २१ दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांना प्रक्रिया पदार्थांची निर्मिती, तसेच विक्रीबाबत माहिती मिळाली. यामुळे आत्मविश्वास वाढला. प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी बचत गटाने २०१६ मध्ये खासगी बॅंकेकडून ३ लाख ९४ हजार रुपये कर्ज घेतले. या कर्जातून काही महिलांनी मसाले गृहउद्योग सुरू केला. काही महिलांनी पिठाची गिरणी घेतली. वंदनाताईंनी आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला.

आवळ्यापासून विविध उत्पादने  
परभणी येथील भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून आवळा, मिरची, टोमॅटो योग्य दरात उपलब्ध होतो. पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य स्थानिक बाजारपेठेत मिळते. वंदनाताईंनी घरातील कुकर, मिक्सरच्या मदतीने आवळा कॅंडी, चूर्ण, ज्यूस, सुपारी, लोणचे बनविण्यास सुरवात केली. याचसोबत बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मिरची लोणचे, लिंबू लोणचे, टोमॅटो लोणचे, चहा मसाला आदी पदार्थांची निर्मिती सुरू केली. गटातील सदस्या पंचशीला भुजबळ, मयूरी वाघमारे, कौशल्याबाई नाटकर, अरुणाबाई म्हस्के यांनी मसाले, पापड  निर्मितीस सुरवात केली. 

बाजारामध्ये आवळ्याची आवक सुरू झाल्यानंतर ३ ते ६ महिने विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. त्यानंतर वर्षभर उत्पादनांची विक्री केली जाते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन २५ ते २५० ग्रॅम वजनाचे पॅकिंग केले जाते. या उत्पादनांना संजीवनी असे नाव दिले. वंदनाताईंनी अन्नप्रक्रिया उद्योगाचा परवाना काढला आहे. 
सौ. वंदना सावंत ः ८४२१५८३५५७

महिलांना मिळाला रोजगार  
कुटुंबाच्या उपजीविकेसाठी रोजंदारी करणाऱ्या काही महिलादेखील बचत गटाच्या सदस्या आहेत. परभणी शहर परिसरातील गावात या महिला दररोज शेतकामांसाठी जातात. शेतीची कामे नसतात तेव्हा या महिला गटाच्या माध्यमातून आवळा प्रक्रिया पदार्थ, लोणचे निर्मिती करतात. यातून त्यांना दररोज सरासरी ८० रुपये रोजगार मिळतो.

थेट विक्रीवर भर  
वंदनाताई स्वतः घरोघर फिरून विक्री करतात. बचत गटांच्या प्रदर्शनात उत्पादनांची चांगली विक्री होते. विक्रीतून दरमहा दहा हजार रुपये नफा मिळतो. वंदनाताईंनी पहिल्या वर्षी २५ किलो आवळ्यापासून कँडी, ज्यूस तयार करून विक्री केली. दुसऱ्या वर्षी एक क्विंटल आवळ्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करून विक्री केली. योग्य गुणवत्तेमुळे उत्पादनांची मागणी वाढत आहे. वंदनाताई कर्जाची नियमित परतफेड करतात. येत्या काळात अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून निर्मिती क्षमता वाढविण्याचे त्यांचे नियोजन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news women parbhani