मोलमजुरीतून मुलाला केले अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे - घरची परिस्थिती बेताची... आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत...मात्र परिस्थिती बदलण्याची ऊर्जा मला त्याच परिस्थितीमुळे मिळाली आणि त्याच वेळी निश्‍चय केला, एक दिवस अधिकारी होऊन हे दिवस बदलेन आणि तो दिवस अखेर उजाडला, हे सांगत होता आकाश अवतारे. 

पुणे - घरची परिस्थिती बेताची... आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत...मात्र परिस्थिती बदलण्याची ऊर्जा मला त्याच परिस्थितीमुळे मिळाली आणि त्याच वेळी निश्‍चय केला, एक दिवस अधिकारी होऊन हे दिवस बदलेन आणि तो दिवस अखेर उजाडला, हे सांगत होता आकाश अवतारे. 

आकाशने राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. आता तो उपजिल्हाधिकारी झाला आहे. वडील अमृत अवतारे व आई आशा अवतारे या दोघांनी मोलमजुरी त्याला मदत केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी या मूळ गावातील अवतारे कुटुंब. शेत कमी असल्याने हे कुटुंब मोलमजुरी करू लागले; मात्र त्यातून मिळणारा मोबदला फारच कमी होता. त्यामुळे त्यांनी आपला संसार पुण्यात हलविला. येथेही त्यांनी मोलमजुरी करण्यास सुरवात केली. गोकुळनगर येथे राहून त्यांनी मोलमजुरी केली. मुलगा सुरज आणि आकाश अवतारे या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्याचे ठरविले.

मोठा मुलगा शिक्षण घेऊन महापालिकेच्या  शाळेत शिक्षक झाला, दुसऱ्या मुलाला आयटी इंजिनिअर केले; इंजिनिअरिंग करत असतानाच आकाशने राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा दिल्या; मात्र यश येत नव्हते; मात्र त्याने जिद्द सोडली नव्हती. या जिद्दीमुळे अखेर यशाला गवसणी घालण्यात त्याला यश आले. तो या वर्षीच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सतरावा, तर अनुसूचित जाती प्रवर्गात राज्यात दुसरा आला. आमदार योगेश टिळेकर यांनी त्याचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akash Avtare Officer Success Motivation