अमर पाटील कुटुंबीयांमुळे चौघांना नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

हृदय, किडनी व लिव्हर यांचे प्रत्यारोपण लवकरात लवकर होईल तेवढे चांगले. त्यासाठीच ग्रीन कॉरिडॉर वापरला जातो. आजची ‘आधार’मधील कामगिरी म्हणजे प्रगत वैद्यकीय उपचार तंत्राच्यादृष्टीने वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, एवढेच म्हणावे लागेल. सर्वच गंभीर आजारांत उपचारासाठी पुणे, मुंबईबरोबरच कोल्हापूरही सुसज्ज आहे, हाही संदेश यातून जाईल. 
- डॉ. उल्हास दामले, व्यवस्थापकीय संचालक, ॲस्टर आधार

कोल्हापूर - डॉक्‍टरांपासून ते ट्रॅफिक पोलिसांपर्यंत सर्वांनी दाखविलेली तत्परता व आस्था आज चौघांच्या आयुष्यात नवसंजीवनी देऊन गेली. गेल्या सोमवारी निगवे-इस्पुर्ली रस्त्यावर अपघातात जखमी झालेला व ब्रेन डेड अवस्थेत पोहोचलेल्या अमर पांडुरंग पाटील (वय ३०) यांचे हृदय, किडनी, लिव्हर आज ग्रीन कॉरिडॉरद्वारे मुंबई, पुणे येथे नेले. तेथे अत्यवस्थ रुग्णांवर त्यांचे प्रत्यारोपणही झाले. कोल्हापुरातून हृदय विमानाने मुंबईत, तर किडनी व लिव्हर पुण्याला रुग्णवाहिकेतून नेण्यासाठी सर्वांनी कसब पणाला लावले. 

किडनी, लिव्हर पुण्याला, तर हृदय मुंबईला 
ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये असलेल्या अमर पाटील यांचे अवयव कमीत कमी चार तासांत दुसऱ्या ठिकाणी पोचविण्यासाठी कोल्हापूर-पुणे मार्गावर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला. आधार हॉस्पिटलपासून विमानतळापर्यंत हृदय नेण्यासाठी तर पोलिसांनी ॲम्ब्युलन्सला वाऱ्याच्या वेगाने वाट करून दिली. वैद्यकीय तंत्रज्ञानाची कसोटी तर लागलीच; पण हॉस्पिटलचे डॉक्‍टर, इतर कर्मचारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी ते कॉन्स्टेबल व विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यात असलेल्या आस्था व सहकार्याच्या भावनेची जाणीव सर्वांना दाखवून दिली. कोल्हापुरातून यापूर्वी ग्रीन कॉरिडॉर यंत्रणेतून किडनी पुण्यापर्यंत नेली होती. आज प्रथमच किडनी, लिव्हर यशस्वीपणे पुण्यात नेले. या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान कोल्हापुरात राबविणे शक्‍य असल्याचेही ॲस्टर प्रशासनाने दाखवून दिले. 

वैद्यकीय तंत्रज्ञानाची ही प्रक्रिया सुमारे तासाहून अधिक काळ सुरू होती. त्याहीपेक्षा या काळात अमर यांची पत्नी मयूरी व त्यांच्या कुटुंबीयातील अन्य सदस्यांनी दु:खाचा डोंगर गिळून अवयवदानासाठी एका क्षणाचाही विलंब न करता संमती दिली. अमर पाटील (निगवे खालसा) साध्या कुटुंबातील तरुण. ते रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या सोमवारी ते निगव्याहून इस्पुर्लीला जाताना टेम्पोने धडक दिली. त्यांना ॲस्टर आधारमध्ये दाखल केले. त्यांची अवस्था पाहून डॉक्‍टरांनी ते बेशुद्ध आहेत. जिवंत आहेत; पण पुन्हा पूर्ण बरे होऊन शुद्धीवर येणे अशक्‍य असल्याचे सांगितले. या अवस्थेला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. या अवस्थेत रुग्णाचे हृदय, किडनी, लिव्हर किंवा अन्य अवयव कार्यरत असतात. संपूर्ण शरीर पूर्ववत हालचाल करू लागण्याची कोणतीही शक्‍यता नसते. 

या अवस्थेत रुग्णाच्या नातेवाइकांनी संमती दिली तर त्याचे अवयवदान करता येते. ते इतर गरजू रुग्णांत प्रत्यारोपण करता येऊ शकतात. 
डॉक्‍टरांनी याची माहिती पाटील कुटुंबीयांना दिली. त्यानंतर अमर यांची पत्नी मयूरी, भाऊ सचिन, मनोज, जितेंद्र यांनी विचारविनिमय करून अवयवदानाला संमती दिली. संमती मिळताच फोर्टिस हॉस्पिटल (मुलूंड, मुंबई), ज्युपिटर हॉस्पिटल (बाणेर, पुणे) येथून त्यांचे पथक आज कोल्हापुरात आले. मुंबईहून खास विमानच येथे आले. आधार हॉस्पिटलमध्ये अवयव काढण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू झाली. ती झाल्यानंतर पूर्ण वैद्यकीय खबरदारी घेत खास छोट्या पेटीमधून हृदय मुंबईकडे, तर लिव्हर, किडनी पुण्याकडे नेण्याची घाई सुरू झाली. 

हृदय विमानाने नेण्यात येणार असल्याने आधार हॉस्पिटल ते विमानतळ या मार्गावरील सर्व वाहतूक ॲम्ब्युलन्स जाताना काही क्षणासाठी रोखली. याच पद्धतीने कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे पोलिसांनी लिव्हर आणि किडनी घेऊन येणारी ॲम्ब्युलन्स पुण्यात पोहचविली.

यंत्रणा अशी राबली...
    हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर यंत्रणेचा कोल्हापुरात प्रथमच वापर
    ॲम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी १५० पोलिस तैनात
    ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये युद्धपातळीवर यंत्रणा हालली
    बंगळूरहून देखरेखीसाठी खास वैद्यकीय पथक ॲस्टर आधारमध्ये
    विमानतळावर महापालिकेच्या अग्निशामक दलासह सर्व यंत्रणा सज्ज
    अवयव प्रत्यारोपणासाठी पाटील परिवाराकडून आदर्श वस्तुपाठ
    ॲस्टर आधार ते विमानतळ अंतर ६ मिनिटे ३२ सेकंदात पूर्ण
    रुग्णवाहिकेने कोल्हापूर ते तांदूळवाडी (ता. वाळवा) पर्यंतचे ३७ किलोमीटर अंतर २७ मिनिटांत कापले. 
    किणी टोलनाकाही यावेळी खुला ठेवण्यात आला होता. 
    त्यापुढे सांगली, कऱ्हाड, सातारासह पुणे पोलिसांनी बंदोबस्त दिला.
    या साऱ्या प्रक्रियेत सर्वच यंत्रणांनी झोकून देऊन काम केले. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला

दीडशे पोलिसांच्या मदतीने ॲम्ब्युलन्सला वाट
शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक बाजीराव सूर्यवंशी, उपनिरीक्षक दिलीप ढेरे, उपनिरीक्षक अंजना फाळके यांनी १५० पोलिसांच्या मदतीने अवयव घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला सुरळीत वाट करून दिली. 

ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय?
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादा अवयव शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात बसविण्यासाठी पाच ते सहा तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते. त्यात अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लागणारा वेळ महत्त्वाचा असतो. त्यासाठी खास परवानगी काढून ग्रीन 
कॉरिडॉर राबवावा लागतो. अवयव घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी पोलिसांची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर मदत करते.

डॉक्‍टरांची भूमिका महत्त्वाची
ॲस्टर आधारचे डॉ. उल्हास दामले, डॉ. शिवानंद आपाराज, डॉ. चंडील कुमार, डॉ. अमोल मुतकेकर, डॉ. प्रवीण घुले, डॉ. आयेशा राऊत, डॉ. अनिकेत सूर्यवंशी यांनी आजच्या वैद्यकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amar patil heart life saving motivation humanity