सांगलीचा ‘जिप्सी’ फिजीचा राजदूत

(शब्दांकन - बलराज पवार)
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

१९९७ ला सर्वप्रथम श्री गणेशाचं छत्र असलेली सांगली सोडली. त्यावर्षी यूपीएससीमधून भारतीय माहिती सेवेला निवड झाली. त्यानंतर १९९८ ला भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये निवड झाली आणि मग तर खऱ्या अर्थाने पाठीवर बिऱ्हाड घेऊन ...देशोदेशी भ्रमण करणारा ‘जिप्सी’ बनलो. सांगलीच नाही तर देशच सुटला. कधी मॉस्को, कधी अर्मेनिया, परत दिल्ली, त्यानंतर शिकागो, कधी सेंट पीटर्सबर्ग (रशिया)... पुढे आपल्यासारख्याच प्राचीन सभ्यतेचे देणे लाभलेल्या इजिप्तमध्ये, तर सध्या भारतापासून ११ हजार कि.मी.वर असलेल्या सुवामध्ये ‘भारतीय राजदूत’ म्हणून फिजी बेटामध्ये माझा परराष्ट्र सेवेमधील प्रवास सुरू आहे...

परदेशात मोठ्या पदावर असलो तरी सांगलीचा, संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा, काळ्याशार मातीचा मला प्रचंड अभिमान वाटतो. माझी मुळे कृष्णेच्या काठावर जोपासली गेली असल्याने त्याला ऊस मळे फुलवणाऱ्या, हळद पिकवणाऱ्या काळ्या मातीने घोटलेली असल्याने ‘विदेशी सेवे’मध्येसुद्धा तू तसाच ‘देशी’ राहिला आहेस, असे माझे मित्र म्हणत असतात. माझे मूळ गाव तसे तासगाव तालुक्‍यातले गौरगाव. आई-बाबा दोघेही सांगली नगरपालिकेत शिक्षक असल्याने मी वाढलो सांगलीतच. माझा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास नगरपालिका शाळा क्रमांक २३ (विश्रामबाग), क्रमांक ७ (खण भाग) आणि क्रमांक १ (‘पिराजी’च्या चहाच्या मागे) झाला. नंतरचे संस्कार झाले सांगली शिक्षण संस्थेच्या ‘सिटी हायस्कूल’मध्ये. ‘विलिंग्डन’ नंतर वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी. ई. (इलेक्‍ट्रॉनिक्‍स) ची पदवी घेतली. त्यानंतर मेल्ट्रॉन (नागपूर), वसंतदादा पाटील कॉलेज (बुधगाव) व वालचंद कॉलेजमध्ये अधिव्याख्याता. असा नोकरीचा प्रवास करत असताना डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या भाषणातून मनात प्रशासकीय सेवेचे बीज पेरले. अगदी कुडाच्या घरात राहून शिकलो.

मी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना वडिलांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. आईच्या पाठिंब्याने हळूहळू सावरत गेलो. सामाजिक जाणिवा नकळतच समृद्ध होत गेल्या आणि ती नकळत होणारी मनाची जडण-घडण वेगवेगळ्या स्तरांवर शासनामध्ये राहून लोकांची आणि देशाची सेवा करवून घेते. त्यातूनच मग ‘शासन तुमच्या दारी’ यासारख्या योजना राबवण्याचा, जिथे असाल तिथे भारतीयांना, भारतीय वंशाच्या लोकांना, ‘हे ऑफिस आहे’ हे वाटण्यासाठी माझे प्रयत्न अविरत चालत असतात. देशहित कुठल्या प्रकारे जोपासले जाईल. कधी कधी आपण आपल्या व्यवस्थेला, शिक्षण व्यवस्थेला खूप नावे ठेवतो. पण आता बऱ्याच ठिकाणी परदेशात वास्तव्य केल्यावर मी ठामपणे आणि अभिमानाने सांगू शकतो, आपल्या व्यवस्था खूप चांगल्या आहेत (त्या आणखी चांगल्या जरूर करायच्या आहेत)... म्हणून तर जगभरात भारतीय शास्त्रज्ञ, इंजिनिअर, डॉक्‍टर, व्यवस्थापक, शिक्षक, कुशल कामगार यांना प्रचंड मागणी आहे आणि आपल्या भारतीयत्वाची जी एक ‘छाप’ (ब्रॅंड) आहे ती खूप तगडी आहे. भारतीयांनी, मग तो युरोप असो की अमेरिका की ऑस्ट्रेलिया किंवा फिजी, सर्वत्र आपल्या हुशारीने, कौशल्याने, कष्ट करण्याच्या क्षमतेने, मेहनतीने, नावीन्याने, मनमिळावूपणाने आणि कायदापालक वृत्तीने जगभर त्या त्या देशांमध्ये विकासात खूप महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. म्हणूनच हा ब्रॅंड खूप समृद्ध झाला आहे... आणि आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ वृत्तीचे आपल्यामधील ‘विविधतेतील एकात्मतेचे’ आणि ‘सहिष्णुतेचे’ जगभर कौतुक होते आहे आणि ‘भारतीय’ म्हटले, की समोरच्याच्या मनात आपोआपच आदरभावाची भावना उत्पन्न होते.

Web Title: Ambassador of Fiji