कोथरूडच्या अनघा ठोंबरेंची कष्टकऱ्यांसाठी धडपड

जितेंद्र मैड 
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

‘सकाळ’मुळे मदतीचे हजारो हात
एकदा एक ब्रेन ट्यूमर झालेली मुलगी माझ्याकडे आली. तिने मला मेंदी व केटरिंगचे काम मिळवून देण्याची विनंती केली. तिला मदत नको होती. स्वतःची समस्या तिला स्व-कष्टातून सोडवायची होती. तिच्याबद्दल मी ‘सकाळ’मध्ये लिहिले आणि मदतीसाठी हात पुढे आले. आज ती मुलगी दोन मुलांची आई असून सन्मानाने जगत आहे. 

पौडरस्ता - अंग झाकायला कपडे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी घासभर अन्नाची गरजसुद्धा भागवता येत नाही, अशी असंख्य कुटुंबं पुण्यात दिसतात. अशांना आवश्‍यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य कोथरूड येथील अनघा ठोंबरे या गेली पंधरा वर्षे करत आहेत. त्यांचे हे कार्य ‘कॅशलेस दुकान’ या नावाने प्रसिद्ध आहे.  

कॅशलेस दुकानात कपडे, चप्पल, छत्री, रेनकोट, स्वेटर, भांडी,  धान्य, पर्स, टूथपेस्ट, बिस्किटे अशा वस्तू लोक आणून देतात. गरजवंतांना या वस्तू मोफत दिल्या जातात. सहजानंद सोसायटीतील बागेश्री या बंगल्यातील हे दुकान दीनदुबळ्यांसाठी सदैव  खुले असते.

गणेशखिंड येथील केंद्रीय विश्वविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका असणाऱ्या ठोंबरे यांनी २००४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून वंचितांसाठी काम सुरू केले. ठोंबरे म्हणाल्या, ‘‘मला फक्त फिल्मी गरिबी माहिती होती. परंतु, प्रत्यक्ष समाजात खूप गरिबी आहे. अनाथ मुले, अर्ध्या रात्री घरातून हाकलून दिलेल्या महिला, ज्येष्ठ यांची परिस्थिती पाहिली की मन हळवे होते. आईने आम्हाला सामाजिक  जाणीव दिली.’’ 
‘‘आमचे हे दुकान मोबाईलसारखे आहे. ते स्वतःच गरजवंताकडे जाते. एखाद्याच्या अंगाला दुर्गंधी येत असल्यास त्याला साबणाची आवश्‍यकता आहे हे लक्षात येते. आम्ही त्याला साबण देतो. हे काही दान नाही. त्याच्या श्रमाचा सन्मान आहे. हे जग कष्टकऱ्यांमुळे घडले आहे. येथे येणारी व्यक्ती कष्टकरी आहे की नाही हे तिच्या चेहऱ्यावरूनच कळते, त्यासाठी सर्टिफिकेटची गरज नाही,’’ असे ठोंबरे सांगतात.

‘सकाळ’मुळे मदतीचे हजारो हात
एकदा एक ब्रेन ट्यूमर झालेली मुलगी माझ्याकडे आली. तिने मला मेंदी व केटरिंगचे काम मिळवून देण्याची विनंती केली. तिला मदत नको होती. स्वतःची समस्या तिला स्व-कष्टातून सोडवायची होती. तिच्याबद्दल मी ‘सकाळ’मध्ये लिहिले आणि मदतीसाठी हात पुढे आले. आज ती मुलगी दोन मुलांची आई असून सन्मानाने जगत आहे. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anagha Thombare struggle for the workers