भुकेल्यांना अन्न देणारे अन्नपूर्णा फ्रीज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

औरंगाबाद - हॉटेलमध्ये जाऊन पैसे मोजून खाणारे अनेकजण असतात; मात्र भुकेल्या पोटाने हॉटेलच्या बाहेर अन्नासाठी आर्त हाक मारणाऱ्यांकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. भुकेल्यांना अन्न मिळावे या विचारातून इनरव्हील क्‍लब ऑफ औरंगाबाद लोटसच्यावतीने ‘अन्नपूर्णा फ्रीज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

औरंगाबाद - हॉटेलमध्ये जाऊन पैसे मोजून खाणारे अनेकजण असतात; मात्र भुकेल्या पोटाने हॉटेलच्या बाहेर अन्नासाठी आर्त हाक मारणाऱ्यांकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. भुकेल्यांना अन्न मिळावे या विचारातून इनरव्हील क्‍लब ऑफ औरंगाबाद लोटसच्यावतीने ‘अन्नपूर्णा फ्रीज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

घरे, हॉटेलमध्ये उरलेले अन्न फेकून न देता ते व्यवस्थित पॅक करून या फ्रीजमध्ये ठेवावे आणि गरजूंनी ते घेऊन जावे अशी ही संकल्पना आहे. या उपक्रमातील पहिला फ्रीज त्रिमूर्ती चौकात बसवण्यात आला आहे. अशाच प्रकारचे सात ठिकाणी अन्नापूर्णा फ्रीज बसवण्याबाबतचे क्‍लबतर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्रिमूर्ती चौकातील पंचवटी  रेस्टॉरंटजवळ मालक मधुकर काळे यांनी हा फ्रीज ठेवला आहे. गरजू व गरिबांसाठी काहीतरी करावे, या भावनेतून निकिता अग्रवाल यांच्या डोक्‍यातून ही संकल्पना पुढे आली आणि त्याला श्री. काळे यांनी तत्काळ संमती दिली आणि हॉटेलच्या बाहेर ४० हजार रुपयांचे इनरव्हील क्‍लबने फ्रीज बसवले. ते म्हणाले, गरीब, लहान मुले, घरून हाकलून दिलेली मुले, बाहेरून येणाऱ्या व्यक्ती, गरजू आदींना लाभ मिळेल. ही संकल्पना मला खूप आवडली. समाजाशी बांधिलकी, समाजसेवेचे व्रत लक्षात घेऊन निकिता अग्रवाल व त्यांचा क्‍लब यांच्या मदतीने अन्नपूर्णा फ्रीज ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली. 

फक्‍त शाकाहारी अन्न 
श्री. काळे म्हणाले, अन्नपूर्णा फ्रीजमधून गरजूंनी आवश्‍यक तेवढेच अन्न घ्यावे. अन्न सोबत घेऊन जावे व इतरत्र जाऊन खावे. आणखी पाण्याची व्यवस्था करणे बाकी आहे. फ्रीजमध्ये रेस्टॉरंटमधील उरलेले आणि चांगले अन्नच ठेवले जाते. शहरातील नागरिक व दानशूर व्यक्‍ती या उपक्रमात योगदान देऊ शकतात. या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी फक्त शाकाहारी अन्नाचाच स्वीकार केला जातो. बाहेरून आणलेले अन्न चांगले असल्याची तपासणी करून खातरजमा केल्यानंतरच ठेवले जाते. या उपक्रमांमुळे गरजूंना मदत होईल. 

अखेर प्रत्यक्षात साकारली संकल्पना 
इनरव्हील क्‍लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या अध्यक्षा निकिता अग्रवाल म्हणाल्या, दोन वर्षांपासून असा उपक्रम सुरू करण्याचा विचार डोक्‍यात होता, तो आता प्रत्यक्षात आला आहे. जिथे अन्नदान करणारे आणि गरजू आहेत अशी जागा निवडावी, असे डोक्‍यात होते. इथे जवळ हेडगेवार रुग्णालय आहे. यामुळे पहिला अन्नपूर्णा फ्रीज इथे बसवला आहे. अशाच प्रकारे शहरातील सात ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. शहरातील हॉटेलमालकांनी पुढाकार घेतला; तसेच प्रायोजक मिळाले तर भुकेल्यांना अन्न मिळू शकेल. अशा दानशूरांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annapurna serves food to the hungry Man