ध्येय कचऱ्यापासून संपत्ती निर्मितीचे! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

कचऱ्यातील वायूंमुळे तो पेट घेऊन धुराचे लोट उठतात आणि परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ होते. हे चित्र बदलण्याचा व कचऱ्यापासून संपत्ती निर्मितीचा प्रयत्न शैलजा रंगराजन यांच्या ‘रिइमॅजिन्ड’ या स्टार्टअपने केला आहे.

शहरांमधील कचऱ्याने धारण केलेले अक्राळविक्राळ स्वरूप ही भारतातील गंभीर समस्या. तुम्हाला कोणत्याही शहरात एका विशिष्ट ठिकाणी मोठे कचरडेपो दिसतात. शहरातील सर्व कचरा रोज त्या ठिकाणी आणून टाकला जातो, त्यातून परिसरात दुर्गंधी पसरते, कचऱ्यातील वायूंमुळे तो पेट घेऊन धुराचे लोट उठतात आणि परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ होते. हे चित्र बदलण्याचा व कचऱ्यापासून संपत्ती निर्मितीचा प्रयत्न शैलजा रंगराजन यांच्या ‘रिइमॅजिन्ड’ या स्टार्टअपने केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांविषयी... 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील कचरा व्यवस्थापन उद्योग अद्याप विकसीत होतो आहे. जागरूकतेचा अभाव, साधनांची आणि पैशांची कमतरता यांमुळे या समस्येवर देशात कोणी फारसे काम करताना दिसत नाही. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण आणि निचरा ही वरवरची मलमपट्टीच ठरते व त्यामुळेच देशभरात तयार होणाऱ्या कचऱ्यातील केवळ ९ टक्के कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. कचऱ्याच्या प्रश्नाचे मूळ कचरा व्यवस्थापनात नसून, लोकांच्या जीवनशैलीशी असल्याचे शैलजा रंगराजन यांनी ताडले व लोकांची वस्तूंचा उपभोग घेण्याची वृत्ती बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने स्टार्टअपची स्थापना केली. शैलजा यांचा जन्म हैदराबादमधील मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्यांनी इंजिनिअरिंग व एमबीएचे शिक्षण पूर्ण केले व कॉर्पोरेट क्षेत्रात १५ वर्षे नोकरी केली, अनेक देशांत फिरून तेथील संस्कृतींचा अभ्यास केला. त्या बंगळूरमध्ये स्थायिक झाल्या व कॉर्पोरेट विश्वातून बाहेर पडत उद्योजक बनल्या. त्यांच्या स्टार्टअपने कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणे, हे ध्येय निश्चित केले. प्रत्येकाने शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करावा व कोणतीही गोष्ट वाया घालवू नये, यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करून ती वापराच्या चक्रात पुन्हा आणणे आणि त्यातून अर्थव्यवस्थेचे चक्र फिरते ठेवण्याचे ध्येय त्यांनी ठेवले. विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून नवे उत्पादन बाजारात आणण्यावर भर द्यायला सुरवात केली. मात्र, सुरुवातीला ग्राहक कचऱ्यापासून तयार केलेली उत्पादने खरेदी करण्यास तयार नव्हते. आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून शैलजा यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली, त्याचबरोबर आपली उत्पादने उच्च दर्जाची असतील हे निश्चित केले. स्टार्टअपने टाकून दिलेल्या कापसापासून साड्या व लोकरीच्या धाग्यापासून ब्लॅंकेट बनवणाऱ्या हॅंडलूम कंपनीशी सहकार्य करार केला. टाकून दिलेले धागे मिळवण्यासाठी त्यांनी ‘राजआर्ट’ या कंपनीशी करार केला व त्यापासून तयार झालेली अनेक उत्पादने बाजारात आणली. लवकरच स्टार्टअपचे स्वतःचे निर्मिती केंद्र कोलकत्यामध्ये सुरू झाले. तेथे विशेष मुलांच्या मातांना रोजगार दिला गेला. आता स्टार्टअप त्यांची उत्पादने केंद्रे व उत्पादनांचे प्रकार वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर वन-स्टॉप-शॉपच्या माध्यमातून सर्व उत्पादने देश व परदेशातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहेत. 

लोकांनी वस्तूंचा किमान वापर करावा, साधी व शाश्वत जीवनशैली ठेवावी हा माझा आग्रह आहे. त्यासाठी मी लोकांना प्रेरित करते. तसे केल्यासच आपण पृथ्वीला वाचवू शकू. वस्तूंचा वापर करताना निसर्ग अथवा मानवाला हानी पोचणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी हा माझ्या स्टार्टअपचा उद्देश आहे. प्रत्येकाने आयुष्यभर पृथ्वीला माझ्याकडून कोणतीही हानी पोचणार नाही, हे पाहावे. 
- शैलजा रंगराजन, संस्थापक, रिइमॅजिन्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Shailja Rangarajan Reimagined startup