कृत्रिम हाताने भरविला चिमुकल्याला घास

ज्ञानेश्वर रायते
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

बारामती - सहा महिन्यांपूर्वी कडबा कुट्टी करताना अचानक हात कुट्टीत गेला, तो कायमचाच. तब्बल सहा महिन्यांनंतर त्या ‘माउली’ने नवीन हाताने आपल्या चिमुकल्याला जेव्हा घास भरवला तेव्हा तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील आनंद असा मिश्र भावना सर्वांनी पाहिल्या. 

बारामती - सहा महिन्यांपूर्वी कडबा कुट्टी करताना अचानक हात कुट्टीत गेला, तो कायमचाच. तब्बल सहा महिन्यांनंतर त्या ‘माउली’ने नवीन हाताने आपल्या चिमुकल्याला जेव्हा घास भरवला तेव्हा तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरील आनंद असा मिश्र भावना सर्वांनी पाहिल्या. 
बारामती रोटरी क्‍लब व पुण्यातील रोटरी डाऊन टाऊन शाखेच्या वतीने शनिवारी (ता. २७) राज्यभरातील १५ दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव बसविण्यात आले. पुण्यातील साने गुरुजी हॉस्पिटल येथे हा उपक्रम झाला. बारामतीतील जिजाऊ भवनचे प्रदीप शिंदे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. यासाठी राज्यभरातील ३० रुग्णांना निवडण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ जणांना शनिवारी हे अवयव बसविण्यात आले. यामध्ये कृत्रिम हाताचा समावेश होता. बारामती तालुक्‍यातील सांगवी येथील कल्पना शिनगारे यांना सहा महिन्यांपूर्वी जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा कुट्टी सुरू केल्यानंतर हात कुट्टीत गेल्याने उजवा हात मनगटापासून कापावा लागला होता. त्यांना शनिवारी हात बसविण्यात आला. त्यांच्यासह इतर १५ जणांना दिवसभरात हात बसवून त्यांच्याकडून आवश्‍यक व गरजेची कामे करता येत असल्याची चाचणी घेण्यात आली. डॉ. अमोल झगडे यांनी ही प्रक्रिया केली. नवा ‘हात’ मिळाल्याने या सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. शिनगारे यांनी तर नवा हात बसविल्यानंतर पेन घेऊन लिहिण्याची आपली सवय शाबूत असल्याची खात्री केली. तसेच मुलाला नाश्‍ता या नव्या हातानेच भरवल्यानंतर तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  

या वेळी रोटरी क्‍लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष दत्तात्रेय बोराडे, सचिव अली असगर बारामतीवाला, माजी अध्यक्ष अब्बास नासिकवाला, पार्श्वेंद्र फरसोले, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial hand Kalpana Shingare