मोगरवाडी शाळेस ‘लाख’मोलाची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

तारळे/नागठाणे - शिक्षणाची शिदोरी सोबत घेऊन विकासाची वाट शोधणाऱ्या डोंगर उंचावरच्या मोगरवाडीस नववर्षारंभदिनी ‘लाख’मोलाची भेट मिळाली. मुंबई महानगरपालिकेत सहायक अभियंता असलेले सुहास नेमाणे यांनी येथील शाळेस एक लाख रुपयांची देणगी दिली.

तारळे/नागठाणे - शिक्षणाची शिदोरी सोबत घेऊन विकासाची वाट शोधणाऱ्या डोंगर उंचावरच्या मोगरवाडीस नववर्षारंभदिनी ‘लाख’मोलाची भेट मिळाली. मुंबई महानगरपालिकेत सहायक अभियंता असलेले सुहास नेमाणे यांनी येथील शाळेस एक लाख रुपयांची देणगी दिली.

मोगरवाडी हे तारळे विभागातील दुर्गम गाव. डोंगर उंचावर वसलेले. जेमतेम वीसेक घरे. लोकसंख्या शंभर. या गावाला शाळेच्या रूपाने विकासाचा कवडसा गवसला आहे. अलीकडच्या काळात दीपक मगर हे शिक्षक नव्याने शाळेत दाखल झाले. त्यांनी सहकारी संगीता चव्हाण तसेच ग्रामस्थांच्या मदतीने गावाचा, शाळेचा कायापालट करण्याचा जणू विडाच उचलला. त्यादृष्टीने गावात तंबाखूमुक्त अभियान, स्वच्छता अभियान हे उपक्रम प्रभावीपणे राबविले. गावात पोचण्यासाठी रस्त्याची समस्या. त्यासाठीही श्री. मगर यांनी मोलाचे योगदान दिले. या शाळेस मुंबई महानगरपालिकेचे सहायक अभियंता सुहास नेमाणे यांनी भेट दिली. शिक्षकांची तळमळ पाहून ते भारावून गेले. त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी तत्काळ एक लाखाची रक्कम सुपूर्त केली. या वेळी कॅनडात शास्त्रज्ञ असलेले किरण तोडकर, तारळ्यातील व्यापारी उदय तोडकर, अमोल बोधले, श्री. नेमाणे यांची कन्या निकिता,  चिरंजीव निशांत, पुतणे वरदराज, अनुप पवेकर, तेजस खोजे आदींची उपस्थिती होती.

सहकारीही आघाडीवर...
शाळेच्या प्रगतीसाठी श्री. मगर सातत्याने प्रयत्नशील आहेत. या प्रवासात त्यांच्या सहकारी मित्रांचीही त्यांना साथ लाभत आहे. या सहकाऱ्यांनी येथील शाळेच्या बांधकामासाठी एक दिवस श्रमदान करून मैत्रीच्या आगळ्या अनुभूतीचे दर्शन घडविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Engineer in Mumbai Municipal Corporation gave Rs one lakh donation to Mogarwadi school