उज्ज्वल जीवनाची ऊर्जा सकारात्मकतेत... 

प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड, परळी 
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सतरा वर्षांनंतर एम.ए.च्या वर्गमित्राची लातूरला भेट झाली. मीही त्याला सतरा वर्षांतील जीवनप्रवास सांगितला. हा प्रवास ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदभाव उमटले; पण मी त्याच्याबाबतीत विचारल्यानंतर त्याचा चेहरा पडला. सहजतेनेच आम्ही एम.ए.ला पाठ केलेली कवी अर्जुन डांगळे यांची कविता त्याच्या मुखातून बाहेर पडली...   

जगत आहोत हे जिणे जगावे लागत आहे म्हणून 
असे हे जिणे जगत असताना 
ही महानगरी आमच्यावर खूश झाली अन्‌... 
तिची बेकार नावाची प्रियतम पदवी आम्हाला बहाल केली...

सतरा वर्षांनंतर एम.ए.च्या वर्गमित्राची लातूरला भेट झाली. मीही त्याला सतरा वर्षांतील जीवनप्रवास सांगितला. हा प्रवास ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदभाव उमटले; पण मी त्याच्याबाबतीत विचारल्यानंतर त्याचा चेहरा पडला. सहजतेनेच आम्ही एम.ए.ला पाठ केलेली कवी अर्जुन डांगळे यांची कविता त्याच्या मुखातून बाहेर पडली...   

जगत आहोत हे जिणे जगावे लागत आहे म्हणून 
असे हे जिणे जगत असताना 
ही महानगरी आमच्यावर खूश झाली अन्‌... 
तिची बेकार नावाची प्रियतम पदवी आम्हाला बहाल केली...

अर्थातच तो बेकारीने त्रस्त झालेला होता. इतकेच काय, तर त्याने आत्महत्या करण्यापर्यंतची भाषा केली. त्यावर मी त्याची समजूत काढली आणि त्याचे खचलेपण बाजूला सारून त्याच्यातील आत्मविश्‍वास जागविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला मराठी जगतातील विठ्ठल कामत, केसरी पाटील, शंकरराव किर्लोस्कर, राम कर्णिक, विजय काळे, रमेश जोशी, सुधीर निरगुडकर, प्रताप पवार, प्रभाकर मुंडले आदी उद्योगपतींनी सुरवातीला कुठलाही अनुभव नसताना केवळ आत्मविश्‍वासाच्या बळावर उद्योगक्षेत्रात पदार्पण केले आणि नेत्रदीपक यश संपादन केले याची जाणीव करून दिली. अगदी जागतिक स्तरावरील पर्यावरणाचा तोल सांभाळणारे पंचतारांकित हॉटेल हा बहुमान मिळविणारे कामत ग्रुपचे सर्वेसर्वा विठ्ठल कामत यांच्यावरसुद्धा एकेकाळी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करण्याची वेळ येते; परंतु सकारात्मक विचार आणि भगीरथ प्रयत्न यामुळे त्या परिस्थितीवर ते मात करतात. त्याचबरोबर कुठलेही भांडवल, पूर्वानुभव नसताना वाचनवेडातून मिळालेल्या ज्ञानावर उटणे बनविणे; या घरगुती व्यवसायाची सुरवात करणारे विजय काळे सचोटी, मेहनत, प्रामाणिकपणा या गुणांमुळे पोळ्या बनविण्याची संधी चालून आल्यानंतर त्या संधीचे सोने करतात. अगदी या उद्योगाच्या माध्यमातून त्यांना जागतिक स्तरावर पोळी निर्यातीचं पेटंट मिळते. अशा या उद्योगविश्‍वातील यशस्वी उद्योगपतींच्या यशोगाथा मी त्याला ऐकवत होतो. मला त्यातून फक्त रामच्या मनाला उभारी देऊन त्याच्यात सकारात्मक भावना निर्माण करावयाची होती. शेवटी रामनेही आता मी आत्महत्या करणार नाही, तर माझा एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार अशी मनोभूमिका बोलून दाखविली. 

राम निघून गेल्यानंतर माझ्या डोक्‍यात बेकारांबद्दलचे विचारचक्र सुरू झाले. आजही कितीतरी मराठी नवतरुण उच्चशिक्षित झाल्यानंतर पदव्यांची भेंडोळी घेऊन निराश मनाने फिरत आहेत. नोकरी नाही लागली अथवा मनासारखे हाताला काम नाही मिळाले तर आत्महत्येसारखे ते पर्याय स्वीकारत आहेत. ही मराठी माणसासाठी शरमेची बाब आहे. नैराश्‍येच्या गर्तेत अडकलेल्या या नवतरुणांनी रडत नव्हे, तर लढत जीवन जगायला शिकले पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊन कुठल्याही क्षेत्रात पदार्पण केले तर निश्‍तिच यश आपल्या पायाशी लोळण घेते. म्हणूनच सकारात्मक जाणिवेने उज्ज्वल जीवन जगण्याची ऊर्जा मिळेल, यात तिळमात्र शंका नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news positive