सात किलोमीटर रस्त्याची श्रमदानातून केली दुरुस्ती!

सुषेन जाधव 
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - खड्ड्यांत गायब झालेला गावचा रस्ता, परिणामी बसही बंद. विद्यार्थ्यांचे हाल. गावात कोणी आजारी पडले तर तालुक्‍याला जायला एक-दीड तास लागायचा. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव दिला. मात्र, वाट पाहण्याशिवाय गावकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. अशातच दिवाळीला गावी येणाऱ्या माहेरवाशिणी कशा येतील, हाही प्रश्न होताच. त्यामुळे ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी एकत्र येत तब्बल २० ते २५ तास श्रमदान केले. त्यातून साकारला तब्बल सात किलोमीटरचा रस्ता.

औरंगाबाद - खड्ड्यांत गायब झालेला गावचा रस्ता, परिणामी बसही बंद. विद्यार्थ्यांचे हाल. गावात कोणी आजारी पडले तर तालुक्‍याला जायला एक-दीड तास लागायचा. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव दिला. मात्र, वाट पाहण्याशिवाय गावकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. अशातच दिवाळीला गावी येणाऱ्या माहेरवाशिणी कशा येतील, हाही प्रश्न होताच. त्यामुळे ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी एकत्र येत तब्बल २० ते २५ तास श्रमदान केले. त्यातून साकारला तब्बल सात किलोमीटरचा रस्ता. श्रमदानातून रस्ता साकारणाऱ्या या गावाचे नाव आहे उस्मानाबादच्या परंडा तालुक्‍यातील भांडगाव. 

सामाजिक बांधिलकी जोपासणारे गाव म्हणून भांडगावने परिसरात ओळख निर्माण केली आहे. गावच्या एकीतून झालेल्या या सात किलोमीटर रस्त्यामुळे शनिवारी (ता. २१) गावात बस येऊ शकली. त्यामुळे भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी बहिणी गावात येऊ शकल्या. अर्थात भावांनी भाऊबीजेला ओवाळणी म्हणून रस्ताच दिल्याची भावना बहिणींची झाली. सर्वांसाठी येण्याजाण्याचा हक्काचा मार्ग मिळाला आणि विद्यार्थ्यांचे हालही थांबले.

भांडगाव हे एक हजार उंबऱ्यांचे गाव. गावाला जोडणारा रस्ता खड्ड्यांनी भरलेला. त्यामुळे बस बंद झाली होती. चालणेही मुश्‍किल बनले होते. खड्डे बुजवा, नाहीतर बस येणार नाही, असे पत्र भूम, बार्शी बस आगारांनी ग्रामपंचायतीला दिल्याचे सरपंच धनंजय अंधारे यांनी सांगितले. त्यांनी हे पत्र जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन रस्तेदुरुस्तीचा प्रस्तावही दिला. मात्र चार महिने काहीच हालचाल झाली नाही. अखेर गावकऱ्यांनीच एकत्र येण्याचे ठरविले. याकामी सरपंच धनंजय अंधारे, बालाजी जामदार, शिक्षक अमोल अंधारे, तुकाराम अंधारे, सचिन अंधारे यांच्यासह गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि सात किलोमीटरचा रस्ता श्रमदानातून पूर्ण केला.

ऐन दिवाळीत श्रमदान
गावातील सुशिक्षित मंडळी, शिक्षक, ग्रामस्थ, शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे तरुण दिवाळीसाठी गावी आल्यानंतर एकत्र आले. ऐन दिवाळीच्या दिवशी १७ ऑक्‍टोबरला त्यांनी भांडगाव-जवळा रस्त्यावरील पुलाचे खड्डे बुजविले. यानंतर लोकवर्गणीतून तब्बल ३५ हजार रुपये गोळा झाले. यातून एक जेसीबी, ४ ट्रॅक्‍टरने खडी, मुरूम टाकून रस्त्याचे काम केले गेले. गावचे तलाठी महेश सातपुते यांनीही लोकवर्गणी देत, स्वतः श्रमदान केले.

साहेब, रस्ता झाला, गाडी सोडा...
रस्त्याचे काम झाल्यानंतर सरपंच अंधारे यांनी भूम आगाराशी संपर्क साधत, रस्त्याचे काम झाले असून बस सोडण्याची विनंती केली. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी (शनिवारी) गावात बस आल्यानंतर गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. ग्रामस्थांच्या श्रमदानाने १०० ते १२० विद्यार्थ्यांचा शिक्षणनिमित्त बाहेरगावी जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

‘प्रवेशद्वार’ दुर्लक्षित 
पश्‍चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात येणाऱ्यांसाठी प्रवेशद्वार असलेल्या भांडगावकडे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. आपले सरकार पोर्टलवरूनही दखल घेतली गेली नाही. जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक सहा आणि गजाजन महाराज पालखी मार्ग असलेल्या या रस्त्याचे आणखी काम असेच सुरू राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने एसटी महामंडळाने बससेवा बंद केली होती. परिणामी विद्यार्थ्यांसह सर्वांचेच हाल होत होते. शासन व आपणच आपले सरकार समजून श्रमदान करून रस्ता करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला व तो तडीस नेला.
- अमोल अंधारे, शिक्षक, भांडगाव

रस्त्याच्या कामाबाबत परंडा उपकार्यकारी अभियंता कार्यालयाला पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. प्रस्ताव दिल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उस्मानाबाद कार्यालयाकडूनही आश्‍वासनाशिवाय काही मिळाले नाही. यातच चार महिने गेले. मग एकत्र येऊन रस्ता करायचा निर्णय घेतला. 
- धनंजय अंधारे, सरपंच, भांडगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news Social commitment