विवाहाचा खर्च टाळून गरजूंना आर्थिक मदत

संजय कापसे 
सोमवार, 18 मार्च 2019

सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे.

कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली. 

आई-वडील सालगडी म्हणून काम करीत असताना संतोष गोंडफळे याने हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. औरंगाबाद येथे एका कंपनीत रिजनल मॅनेजर पदापर्यंत झेप घेतली. संतोषने परिस्थितीची जाण ठेवून गरजूंना मदत करण्याची भूमिका घेतली. परभणीतील त्याच्या मित्रपरिवारात असलेल्या प्रा. गजानन इसादकर, श्री. शिंदे, श्री. डपुरे, भागवत जाधव, डॉ. अशोक गोरे, बाळासाहेब मोरे, प्रकाश भालेराव, शिवाजी नवघरे, उमेश काळे, श्‍यामसुंदर निरस यांनी संकल्प राष्ट्र उभारणी हा ग्रुप स्थापन केला. या ग्रुपच्या माध्यमांमधून चाळीस गरजू महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्येही संतोष यांचा वाटा आहे. दरम्यान, संतोष यांचा विवाह सावरगाव, (ता. भोकर, जि. नांदेड) येथील सपना दत्तराव सिद्धुसरे हिच्याशी ठरला. संतोषने नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला व एक लाखाची मदत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना देण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवारी (ता. 16) लासिना येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही रक्कम सुपूर्द केली. यातील पन्नास हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 80 मुलं दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक मदत करणाऱ्या परभणीतील जिजाऊ ज्ञानपीठ वस्तीतीर्थ या संस्थेला दिली; तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सविता परमेश्वर जाधव (ढासाळा, ता. सेलू, जि. परभणी) या महिलेला पिठाची गिरणी व मिरची कांडप यंत्र, गावांमधील शाळेला शैक्षणिक साहित्य व रंगरंगोटी करिता 15 हजार अशा जवळपास एक लाख रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. या वेळी प्रवीण महाराज पुसदकर, नितीन लोहट, शंकरराव कदम, सुभाष गोंडफळे यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoiding marriage expenses one lac has been provided for the children of suicide victims