मानपानाचे धन दुष्काळग्रस्तांच्या झोळीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

आपटाळे - मूळचे जुन्नर तालुक्‍यातील माणिकडोह येथील असलेले व सध्या जुन्नर येथे वास्तव्यास असणारे राजेश शशिकांत ढोबळे यांनी मुलाच्या लग्नातील मानपानाच्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देऊ केली. ढोबळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

राजेश ढोबळे यांचा मुलगा सौरभ व रामेश्वर जयसिंग मोरे यांची कन्या मनाली यांचा विवाह लेण्याद्री येथे नुकताच झाला. या विवाहात टॉवेल, टोपी, फेटा यांसारख्या मानपानाला फाटा देऊन ढोबळे व मोरे कुटुंबाने दुष्काळग्रस्तांसाठी २५ हजार रुपये, बल्लाळवाडी येथील राजाराम पाटील वृद्धाश्रमास ११ हजार रुपये व नाशिक येथील गाईंचा सांभाळ करणाऱ्या त्र्यंबकेश्वर मठास ११ हजार रुपयांची भरीव मदतनिधी या वेळी देण्यात आला. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते या वेळी धनादेश देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, नगराध्यक्ष श्‍याम पांडे, सुरेश ढोबळे, सुनील ढोबळे, उमाकांत ढोबळे, स्वप्नील ढोबळे, दीपक ढोबळे यांसह ढोबळे व मोरे परिवारातील सदस्य उपस्थित होते. 

याबाबत राजेश ढोबळे यांनी सांगितले, की लग्नात मानपान म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंचा विनियोग योग्य पद्धतीने होत नाही. तालुक्‍यात बहुतांशी ठिकाणी दुष्काळी परिस्थिती भयानक स्वरूपात आहे. या दुष्काळात या अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक परिस्थितीचे भान  ठेवून लग्नातील अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन वंचितांना मदत करावी.

Web Title: Avoiding wedding expenses financial help to droughtaffected people