उतारवयात अवयवदान जागृतीसाठी धडपड

धनाजी पाटील
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

पुनाळ - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असूनही काही युवक केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीअभावी मागे राहतात; पण वयाच्या ६७ व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने एक ६७ वर्षांचा अवलिया अवयव दानाच्या जनजागृतीसाठी घराबाहेर पडला आहे. प्रमोद लक्ष्मण महाजन, असे त्यांचे नाव. १०० दिवसांच्या मोटारसायकल दौऱ्यात १० हजार किलोमीटरचा प्रवास ते करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत.

पुणे येथील रिबर्थ सोसायटी अवयव दानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी देशव्यापी अभियान राबवते. त्यांच्याच सौजन्याने प्रेरणा घेऊन महाजन जागृती करीत आहेत.

महाजन ढवळी (ता. वाळवा) येथील शेतकरी कुटुंबातील केवळ अकरावी पास असून त्यांना समाजकार्याची आवड आहे. त्यातूनच त्यांनी २००९ साली एड्‌स जनजागृतीसाठी मोटारसायकलने साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. प्रत्येक वर्षी भारतात एक लाख पाच हजार ब्रेनडेड होतात; पण त्यातील केवळ ८१७ जणांचेच अवयवदान होते. जागरुकतेअभावी किडनी प्रत्यारोपणासाठी लाखो रुग्ण प्रतीक्षेत आहेत. याचा विचार करून किडनीदान जागृतीसाठी ते प्रयत्नरत आहेत. 

विविध आरोग्य संदेश रेखाटलेल्या मोटारसायकलने आतापर्यंत त्यांनी साडेनऊ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. २१ ऑक्‍टोबर २०१८ रोजी पुण्यातून अभियानाला सुरुवात केली असून २५ जानेवारीला पुणे येथे समारोप होणार आहे. मुंबई, राजस्थान, गुजरात, हरियाना, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड करत त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. रोजचा दोनशे किलोमीटरचा प्रवास ते करतात. 

स्वतःची किडनी दान
कळे (ता. पन्हाळा) येथे ‘सकाळ’शी बोलताना महाजन म्हणाले, ‘‘अवयव निकामी झाल्याने भारतात दरवर्षी पाच लाख रुग्ण मृत्यू पावतात. त्यामुळे १८ वर्षांपूर्वी स्वतःपासून सुरुवात केली. एका सैनिकाला माझी किडनी दान केली. तेव्हापासून आजतागायत अवयव दान चळवळ सक्षम करण्यासाठी धडपडत आहे. एक मृत मेंदू दहा जणांना जीवदान देऊ शकतो. ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: awakening movement for organ donation by Pramod Mahajan