दुर्गम दऱ्या-डोंगरातील गुराखी ते डॉक्‍टरेट..! ; घुरकेचा संघर्षमय प्रवास

संदीप खांडेकर
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला. त्याच बाबूरावने गुराखी ते प्राध्यापक अशा खडतर संघर्षानंतर पीएच. डी. मिळवली आणि तो शाहूवाडी तालुक्‍यातल्या १०४ धनगरवाड्या-वस्त्यांवरील डंगे धनगर समाजातला पहिला डॉक्‍टरेट झाला. 

बाबूरावचे आई-वडील अशिक्षित. त्यामुळे त्याची मूळ जन्मतारखेचा पत्ता नाही. त्याचे प्राथमिक शिक्षण गिरगाव धनगरवाड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याने माध्यमिक शिक्षण गावापासून आठ किलोमीटर दूर असलेल्या येळवण जुगाईमधील जुगाई हायस्कूलमधून घेतले. मलकापुरातील ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पदवीच्या शिक्षणासाठी तो महावीर महाविद्यालयात दाखल झाला. शिक्षण घेत असताना तो गुराख्याचे काम करत राहिला. कमवा व शिका योजनेत श्रमदान करत त्याने 

भूगोल विषयात पदवी, तर शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागशास्त्र विभागातून पदव्युत्तर पदवी मिळवली. कळंबा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात राहून त्याने आयटीआय पूर्ण केला. एम. ए.चे शेवटचे वर्ष संपताच ‘नेट’सारख्या अवघड परीक्षेत त्याने यशाचा झेंडा फडकवला. 

या यशानंतर त्याने पीएच. डी. साठी प्रवेश घेतला. मुंबई येथील प्रा. डॉ. रतन हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लेव्हल ऑफ सोशल डेव्हलपमेंट इन कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट : जिऑग्राफिकल ॲनॅलेसिस’ विषय शोधप्रबंधासाठी निवडला. त्याचा काटेकोर अभ्यास केला. त्यासाठी बारा तालुक्‍यातील चोवीस गावांची पायपीट केली. ग्रामस्थांचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अभ्यास केला. त्याच्या शोधप्रबंधाचे नुकतेच सादरीकरण झाले आणि त्याचे डॉक्‍टरेट होण्याचे स्वप्न सत्यात उतरले. 

शाहू महाविद्यालयात प्राध्यापक
सध्या तो रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात भूगोल विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याला प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सुरेश पवार, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. मीना पोतदार, डॉ. दिनेश भंडारे, डॉ. विक्रम पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baburao Ghurke success story of Gurakhi to Doctorate