बेबीताईंचा प्रवाहाविरुद्ध जीवनप्रवास

रामदास वाडेकर
शनिवार, 16 जून 2018

टाकवे बुद्रुक - नावाडी म्हणून भूमिका बजावत नाणोलीतर्फे चाकण येथील महिला आपल्या संसाराचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून ओढत आहे. सोसाट्याचा वारा असो, की मुसळधार पाऊस, कडाक्‍याची थंडी अथवा रणरणते ऊन, या कशाचीही पर्वा न करता ती आपल्या कुटुंबीयांसाठी राबत आहे. मात्र, अलीकडच्या काळात तिच्या होडीची दुरवस्था झाली आहे. होडीला पडलेल्या छिद्रातून केव्हाही पाणी आत येऊ शकते. मात्र, जीव धोक्‍यात घालून ती प्रवाशांची वाहतूक करत आहे. 

वय वर्षे पन्नाशीतील बेबी गव्हाणे ही भगिनी. वास्तविक गेल्या दोन पिढ्यांपासून गव्हाणे कुटुंबीय वराळे व नाणोली तर्फे चाकण या दोन गावांना अविरतपणे ही सेवा देत आहे. बेबीताईंचे सासरे दत्तात्रेय गव्हाणे इंद्रायणीच्या या तीरावरून त्या तीरावर ग्रामस्थांची ने-आण करीत. त्यांच्या या कामाचा मोबदला म्हणून ग्रामस्थ त्यांना आपल्या शेतात पिकणारे धान्य बलुतं म्हणून देत. वावरातील ज्वारी, बाजरी, गहू, भात अशा धान्यावर या कुटबीयांचा उदरनिर्वाह होत असे. दत्तात्रेय यांच्यानंतर त्यांचा मुलगा नाव हाकीत होता. पण, वयोमानानुसार त्यांना ही सेवा देणे जड जाऊ लागले. अखेर, सूनबाई बेबीताई नावाडी बनल्या. कुटुंबाला त्याच्या बलुत्याने आधार दिला. असे असले, सध्या सर्वच शेतकरी बलुते देतात, असे नाही.

नाणोलीतील दूध व्यावसायिकांनी या नावेतून प्रवास करणे बंद केले आहे. नावेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकही प्रवासाच्या मोबदल्यात काहीच देत नाहीत. या नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याबाबत अद्याप काही भूमिका स्पष्ट करताना दिसत नाही. 

आजच्या घडीला ५० हून अधिक कुटुंबीय नावेतून दररोज प्रवास करतात. याबाबत बेबीताई म्हणाल्या, ‘‘बलुतेतून मिळणाऱ्या धान्यावर पोट भरत नाही. पावसाळ्यात जिवाला मोठा धोका निर्माण होतो. आमच्याकडे शेत नाय, आम्ही जगायचे कसे? मुलाच्या पायाला दुखापत झाली आहे, त्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. पण, खिशात दमडी नाय. आम्ही काय करावे?’’

Web Title: babytai gavhane lifestyle motivation