पुण्यातही ‘बजरंगी भाईजान’

पुण्यातही ‘बजरंगी भाईजान’

इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट

पुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून नेपाळमधील मोहतारी जिल्ह्यातील बडदिवस गावात संपर्क साधला आणि १७ वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या दीपक कटुवालची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून नेपाळला रवाना केले. पुण्यातील या ‘हुसैन भाईजान’च्या कामगिरीमुळे नेपाळ आणि भारताचे नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी दीपक नेपाळमधील काही तरुणांसमवेत नोकरीसाठी दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधील भूज येथे २००१ पर्यंत राहत होता. भूजमध्ये झालेल्या भूकंपानंतर रेल्वेमधून दीपक पुण्यात आला. टिळक चौक, जंगली महाराज रस्ता येथे चहा विकण्याचे काम तो करत होता. काही वर्षांपूर्वी हुसैन यांच्या हॉटेलमध्ये दीपकची ओळख झाली. त्यानंतर दीपकने जनकपूर, मोहतारी आणि बडदिवस अशी गावांची नावे हुसैन यांना सांगितली. त्यावरून मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू केला. अखेर दीड वर्षानंतर हुसैन यांच्या प्रयत्नांना यश आले.

रेल्वे प्रवासात असलेल्या शेरबहादूर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘हुसैन आमच्यासाठी भगवान आहेत. त्यांच्यामुळे १७ वर्षांपासून दुरावलेला आमचा भाऊ आम्हाला सापडला. गुजरातमधील भूकंपामध्ये भावाचा मृत्यू झाला, अशी समजूत करून आम्ही गावी राहत होतो. सध्या आमच्या घरी आणि गावात दिवाळी साजरी केली जात आहे.’’
या शोधकार्याबद्दल मुजाहिद हुसैन म्हणाले, ‘‘दीड वर्षापासून दीपकच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. डिसेंबर २०१५ मध्ये इंटरनेटवरून नेपाळमधील जनकपूरच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी मोहतारी जिल्ह्यातील बडदिवस गावातील एका अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक दिला. मग त्यांच्याशी संपर्क साधून दीपकबाबत त्यांना माहिती दिली. तीन दिवसांनी दीपकचा मोठा भाऊ शेरबहादूरने माझ्याशी संपर्क साधत, ‘दीपक खरच जिवंत आहे का? आम्ही त्याला घ्यायला येतो’, अशी विचारणा केली.’’ त्यानंतर दोघा भावंडांचे मोबाईलवर बोलणे झाले.

फेसबुक आले कामी
फेसबुकवर दीपकसोबत माझे फोटो टाकून शेरबहादूर यांचा मुलगा राजीव कटुवाल याला ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठविली. मग फेसबुकवरील फोटोवरून एकमेकांची ओळख झाली, जिवंत असल्याची शहानिशा झाली. त्यानंतर दिल्लीवरून पंजाबमार्गे शनिवारी (ता. १५) पुण्याला पोचल्यानंतर शेरबहादूर आणि त्याची पत्नी बहिरटवाडी येथे माझ्या घरी आले अन्‌ त्यांचा पाहुणचार केल्याचे मुजाहिद हुसैन यांनी सांगितले. गेल्या सोमवारी (ता. १७) झेलम एक्‍स्प्रेसमधून दीपक हा मोठा भाऊ शेरबहादूर आणि वहिनींसोबत दिल्लीकडे रवाना झाला.  सध्या तो लखनौ येथे रेल्वे प्रवासात आहे.

दीपकच्या कुटुंबीयांशी कसा संपर्क साधला जाईल, अशी शंका होती; परंतु माझ्या पतीने जिद्द सोडली नाही. अखेर त्याची कुटुंबीयांशी भेट घडवून आणली.
-  मल्लिका, हुसैन यांची पत्नी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com