हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

पुणे येथील इंद्राणी बालन फाउंडेशन आणि परिवर्तन संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील 600 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

 सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमी आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावणारे जवान येथील घराघरांतून निर्माण होतात. शौर्याची परंपरा असलेल्या या भूमीतून मला आतंकवाद्यांशी लढण्याची मला प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवाद मोर्चाचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - तरुणांनो करा, हृदयावर प्रेम...
 
पुणे येथील इंद्राणी बालन फाउंडेशन आणि परिवर्तन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील दुर्गम भागातील 600 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात सायकलींचे वाटप करण्यात आले. त्या वेळी श्री. बिट्टा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, शिवाजीराजे भोसले, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल, परिवर्तन संस्थेचे अभिजित घुले, सारंग पाटील उपस्थित होते.

बीड येथील बालग्राम सहारा अनाथालयाच्या संतोष गर्जे आणि प्रीती गर्जे यांना खासदार पाटील यांच्या हस्ते परिवर्तन पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतंकवाद्यांच्या विरोधात लढताना श्री. बिट्टा यांच्यावर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले आहेत. आजही त्यांचा लढा सुरू आहे. त्यांनी परिवर्तन संस्था आणि बालन ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक केले. सातारा आणि शौर्य हे एकमेकांचे अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले. 

अवश्य वाचा - अमर रहे...अमर रहे...शहीद जोतिबा चौगुले अमर रहे..

ते म्हणाले, ""उपेक्षितांना साधने देण्याचे मोठे कार्य बालन ग्रुपच्या वतीने केले जात आहे. येथील खेडापाड्यातील मुलांना त्यातून मोलाची मदत होत आहे. ही भूमी पराक्रमी पुरुषांची आहे. येथील युवकांच्या धमण्यातून आजही गरम रक्त वाहत आहे. त्यामुळेच येथील घराघरांतील जवान देशासाठी प्राणाची बाजी लावत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना मी गुरू मानतो. या भूमीतून मी प्रेरणा घेत असतो. विद्यार्थ्यांनी या मदतीतून यश मिळवून येथील शौर्यांची परंपरा पुढे न्यावी.''

 
खासदार पाटील म्हणाले, ""कृष्णा- कोयना आणि वारणा काठ हा लढवय्यांचा प्रदेश आहे. त्यामुळे येथे शौर्याची ज्योत धगधगत असते. या भूमीत बालन ग्रुपच्या वतीने मोठे कार्य केले आहे. हजारो सायकली आणि संगणक देऊन मुलांना शिक्षणाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. '' या वेळी शिवाजीराजे भोसले, पुनीत बालन, जान्हवी धारीवाल, परिवर्तन संस्थेचे अभिजित घुले, सारंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत 

बालन ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांप्रमाणेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनाही भरीव मदत करणार असल्याचे बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जाहीर केले. त्यानुसार 25 हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि 25 जखमी जवानांना प्रत्येकी एक लाखाचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार पाटील यांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना 200 सायकली, शाळांना संगणक देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balan Group Announced Two lakh Ruppees Help To Families Of The Martyrs