esakal | तरुणांनो करा, हृदयावर प्रेम...
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Kaushik Patil

काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो. 

तरुणांनो करा, हृदयावर प्रेम...

sakal_logo
By
विशाल पाटील

सातारा : दोन ते तीन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका (हार्ट ऍटॅक) हा आता विशी आणि तिशीतील तरुणांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक तरुणांना अँजिओप्लास्टी करावी लागते. हा नक्कीच तरुण पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम यावर लक्ष देऊन तरुणांनी हृदयावरही प्रेम केले पाहिजेच, या बाबत सातारा येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांच्‍याशी संवाद साधला. 

हेही वाचा : ...तर समाज अन्‌ देशही तंदुरुस्त बनेल

डाॅ. पाटील म्‍हणाले, ‘‘कालच एका 25 वर्षे वय असलेल्या तरुणाची अँजिओप्लास्टी केली. आणखी एका तिशीतील तरुणाची अँजिओग्राफी केली असून, त्याला बायपास सर्जरीची गरज पडणार आहे. महिन्यापूर्वीच एका तरुणाला ऑफिसमध्ये काम करताना हृदविकाराचा झटका आला; पण रुग्णालयात येण्याइतपतपण वेळ त्याला मिळाला नाही.’’ 

तरुणा पिढीला रेड सिग्नल

तरुण मुलांमध्ये कोकेनची नशा करण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. यामुळे उच्च रक्‍तदाब, हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणे, हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका वाढतो. हा नक्कीच आपल्या पिढीला मिळालेला रेड सिग्नल आहे. 

वाचा : कार्यालयात खुर्चीत बसूनही करता येईल व्यायाम; हे आहेत प्रकार

तरुणांमध्ये व्हॅस्कुलायटिस 

हा एक दुर्मिळ आजार होतो. त्यामुळे विविध रक्‍तवाहिन्यामध्ये असलेला आतील थर खराब होतो. यामधील एक कावासाकी डिसीजमध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिन्या खराब होतात आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. तरुण स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा गरोदरपणात कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वहाढतो. याध्ये हृदयाच्या रक्‍तवाहिनीतील आतील थर इतर थरांपासून वेगळा होतो (सोलवटूत निघतो). यामुळे हृदयाला होणारा रक्‍तप्रवाह बंद पडून हृदयविकाराचा झटका येतो. 

हायपरट्रायग्लिसरायडेमिया आणि हायएअरकोलेस्टोलेमिया 

या अनुवंशिक आजारामध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते. यामुळे हृदयाच्या रक्‍तवाहिन्यात ब्लॉकेजेस होऊन हॉर्टऍटॅकचा धोका वाढतो. 
हायपरहोमोसिस्टिनेमिया : यामध्ये शरीरातील होमोसिस्टीन हा घटक प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. यामुळे शरीरामध्ये रक्‍त अधिक घट्ट झाल्याने विविध भागांत रक्‍ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका कमी वयातच येण्याचा धोका राहतो. योग्य वेळी रक्‍ताची तपासणी करून याचे निदान झाल्यास योग्य उपचार पद्धती चालू केल्यास पुढील धोका टळतो. 


तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. यामधील इस्ट्रोजेन या हार्मोनमुळे धमन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. जेणेकरून हार्ट ऍटॅक येऊ शकतो. यामधील इस्ट्रोजेन ऐवजी प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यास हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 

आणखी वाचा :  योगासने आणि फायदे


"ड' जीवनसत्त्वाअभावीही धोका 

नवीन संशोधनानुसार "ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेने देखील उच्च रक्‍तदाब आणि हार्टऍटॅकचा धोका वाढतो. यामुळे ड जीवनसत्त्व वाढण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात व्यायाम करावा, तसेच आज काल "ड' जीवनसत्त्वाचा योग्य डोस पुरविणाऱ्या गोळ्या देखील मिळतात. 

हृदयविकाराची कारणे... 

अनुवंशिकता ः जर घरामध्ये जवळच्या नातेवाइकांना, खासकरून आई किंवा वडिलांना हृदयविकाराचा आजार असल्यास मुलांना कमी वयातच हा धोका उद्‌भवतो. अशा व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल, 2 डी इको, ट्रेडमिल टेस्ट, ईसीजी करून घेणे जरुरी आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराच झटका येण्याअगोदरच असलेल्या आजाराचे योग्य निदान होऊ शकते. 

कमी वयातील डायबेटीस/ उच्च रक्तदाब : अशा रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यांनी वरील सर्व तपासण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, तसेच या रुग्णांमध्ये रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे आहे. 

धुम्रपान, मद्यसेवन : आजकालच्या तरुण पिढीमध्ये धुम्रमानाचे प्रमाण फार जास्त आहे. विशेषत: तंबाखू खाणे, सिगारेट ओढण्यामुळे हे सर्व धोके ओढावले जातात. यामुळे कमी वयात हार्टऍकॅट येण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो. 

खाण्याच्या अयोग्य सवयी : तरुणांमध्ये जंकफुड (उदा. पिझ्झा, बर्गर, चिप्स, वडापाव आदी) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. रक्‍तवाहिन्यातील चरबीचा थर वाढत जातो आणि त्या रक्‍तवाहिन्या बंद होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव : आजकालच्या तरुणाईमध्ये जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. खाण्याच्या सवयीतील बदलांबद्दल आपण अगोदरच बोललो आहोत, तसेच यामध्ये व्यायामाचा अभाव देखील दिसून येतो. आजकालच्या मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव दिसून येतो. टीव्ही, तसेच व्हिडीओ गेम्सच्या वाढत्या सवयींमुळे मुलांमध्ये व्यायामाची कमतरता दिसून येत आहे. अशा तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका उद्‌भवतो. 

वाचा : अशी घ्या मुलांच्या लठ्ठपणाची काळजी

हॅप्पी गो लकी टाइप

या व्यतिरिक्त व्यावसायिक, दैनंदिनीमधला वाढता तणाव देखील धोकादायक आहे. आजकालच्या स्पर्धेच्या वातावरणामुळे तरुण लोक सतत तणावाखाली राहतात. यालाच "टाईप ए पर्सनॅलिटी' असे म्हणतात. याऊलट तणावापासून दूर, आनंदी आणि अधिक "हॅप्पी गो लकी टाइप' राहणारे लोक "टाईप बी पर्सनॅलिटी'मध्ये मोडतात.  स्वतःला हार्टऍटॅकपासून दूर ठेवण्यासाठी "टाईप बी पर्सनॅलिटी' होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
जीम करणाऱ्या लोकांमध्ये होणारा अवास्तव स्टेराईडचा वापर देखील हार्टऍटॅकला कारणीभूत ठरतो. 

दुर्लक्ष बेतू शकते जीवावर : काही वेळा छातीत दुखणे हे स्नायूंचे दुखणे किंवा ऍसिडिटी आहे, असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो खरोखरच हृदयविकाराचा झटका असू शकतो. 

हृदयविकारा कसा टाळावा : 

दररोज कमीतकमी 30 मिनिटे नियमित व्यायाम करावा. 
जंकफूट खाणे टाळावे. खारट, तेलकट पदार्थ कमीतकमी घ्यावेत. 
भरपूर पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये खावीत. 
धूम्रपान, अती मद्यपान टाळावे. 
चांगले छंद जोपासावेत (उदा. वाचन, मैदानी खेळ, चित्रकला आदी) 
मोबाईलचा अवास्तव वापर टाळावा. 
लहान मुलांतील व्हिडीओ गेम, टीव्ही पाहण्याचे प्रमाण कमी असावे. 
मैदानी खेळ वाढवावेत. 
व्यवसायातील मानसिक तणाव हाताळता आले पाहिजेत. 
हृदयविकाराची काहीही लक्षणे उद्‌भवल्यास वेळीच योग्य तपासण्या करून घ्याव्यात. (ईसीजी, 2 डी ईको, ट्रेडमिले टेस्ट). 
आई-वडिलांना मधुमेह अथवा इच्च रक्तदाब असल्यास वेळच्या वेळी स्वतःची तपासणी कराव्यात. 
कमी वयात मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असल्यास वेळोवेळी हृदयाच्या तपासण्या करणे आवश्‍यक. 

loading image