हारकी लिंबगावची पपई नागपूरच्या बाजारात

कमलेश जाब्रस
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

माजलगांव - तालुक्‍यातील हारकी लिंबगाव येथील शेतकरी उद्धव गायकवाड यांनी त्यांच्या शेतात पाच एकर पपईची लागवड केली आहे. ही पपई नागपूरच्या बाजारात सव्वाअकरा रुपये किलो दराने विक्री होत असून साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन मिळणार असल्याचे शेतकरी उद्धव गीताराम गायकवाड यांनी सांगितले. 

माजलगांव - तालुक्‍यातील हारकी लिंबगाव येथील शेतकरी उद्धव गायकवाड यांनी त्यांच्या शेतात पाच एकर पपईची लागवड केली आहे. ही पपई नागपूरच्या बाजारात सव्वाअकरा रुपये किलो दराने विक्री होत असून साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन मिळणार असल्याचे शेतकरी उद्धव गीताराम गायकवाड यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील हारकी लिंबगाव येथे उद्धव गायकवाड यांची १८ एकर शेती आहे. वडील गीताराम गायकवाड, भाऊ विलास गायकवाड, गोवर्धन गायकवाड हे सातत्याने पारंपरिक शेती करतात. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी ‘ॲग्रोवन’मधून त्यांना प्रेरणा मिळाली. यातून श्री. गायकवाड यांनी तैवान ७८६ जातीच्या पपईचे पाच हजार रोपे मोहोळ येथून आणले. दोन एकरमध्ये १० नोव्हेंबर २०१६, तर तीन एकरमध्ये १२ फेब्रुवारी २०१७ ला या रोपांची लागवड आठ बाय सहा अंतरावर केली. सेंद्रिय खताचा वापर करीत शेतातील उपलब्ध असलेल्या विहिरी, विंधन विहिरीच्या पाण्यावर लागवड केली. २ एकरमधील पपईचे उत्पादन झाले असून नागपूर येथील व्यापारी स्वतः बांधावर येऊन मागील आठवड्यांपासून पपई नागपूरच्या बाजारात सव्वाअकरा रुपये प्रतिकिलो भावाने विक्रीस नेत आहेत. यापूर्वी उद्धव गायकवाड यांनी शुगरकेन जातीच्या टरबुजाची लागवड केली होती.

यातूनदेखील त्यांनी भरघोस उत्पादन मिळविले होते. दोन एकरमध्ये गोल्ड स्पॉट - २ या जातीची झेंडू शेती केली आहे. केज येथील नर्सरीमधून ही रोपे आणली असून पाच बाय दीड अंतरावर मल्चिंगवर फुलांची लागवड केली आहे. झेंडू फुलास कल्याणच्या बाजार पेठेत चांगला भाव असून फुलांची विक्री त्या ठिकाणी करण्यात येत आहे. या फूलविक्रीतून दोन लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे शेतकरी गायकवाड यांनी सांगितले. फूलशेती व पपई लागवडीसाठी दीड लाख रुपये खर्च आला असून पाच लाख रुपये पपईतून, तर दोन लाख रुपये फूलशेतीतून असे सात लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed news majalgaon Papaya farmer

टॅग्स