बेळगाव कॅंटोन्मेंट मराठी शाळेत उपक्रमांमुळे वाढली पटसंख्या

मिलिंद देसाई
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

कॅंटोन्मेंट मराठी शाळेला मोठा इतिहास असून लवकरच शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधांसह मोफत शिक्षण दिले जात आहे. 
- पी. एस. बिर्जे, मुख्याध्यापक 

बेळगाव -  मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. परंतु, शिक्षकांनीच प्रयत्न केल्यास मराठी शाळांमध्येही पटसंख्या वाढू शकते, हे कॅंटोन्मेंट मराठी शाळेने दाखवून दिले आहे. विविध उपक्रम आणि दर्जात्मक शिक्षणामुळे या शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे. २०१९-२० चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच आतापर्यंत ५० विद्यार्थ्यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतला आहे. १९२० मध्ये सुरू झालेली ही शाळा शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. 

कॅम्प परिसरातील रहिवासी आणि सैनिकांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा मिळावी, यासाठी स्वांतत्र्यपूर्व काळात कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे बेळगावात मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १ मार्च १९२० मध्ये कॅंटोन्मेंट मराठी शाळेस प्रारंभ झाला.

शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेतले आहे. १९९० पर्यंत मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत १,४०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, त्यानंतर दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. २०१६ मध्ये पहिलीत केवळ पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. परंतु शिक्षकांनी विविध उपक्रम राबविल्यामुळे दोन वर्षांतच पुन्हा एकदा शाळा बहरली. गतवर्षी पहिलीत ४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून सध्या शाळेची पटसंख्या २४४ आहे.

पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला आहे. त्यामुळे सर्रास सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असतानाच कॅंटोन्मेंट  मराठी शाळेत वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. या शाळा व शिक्षकांप्रमाणेच इतर शाळांनीही प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. दरम्यान, प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश शुल्क किंवा देणगी (डोनेशन) घेतले जात नसून विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा, बचतीचे महत्त्व पटण्यासाठी ‘स्कूल मनी सेव्हिंग बॅंक’ सुरू केली आहे.

कॅंटोन्मेंट मराठी शाळेला मोठा इतिहास असून लवकरच शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधांसह मोफत शिक्षण दिले जात आहे. 
- पी. एस. बिर्जे, मुख्याध्यापक 

सुविधा अशा : 

  •  सुसज्ज इमारत 
  •  सर्व वर्गखोल्यांत पंखा, ट्यूबलाईट व बेंचची सोय 
  •  सांस्कृतिक भवन व माध्यान्ह आहारासाठी स्वतंत्र व्यवस्था 
  •  पिण्यासाठी फिल्टरचे पाणी 
  •  संगणक शिक्षणाची सोय
  •  खेळासाठी विशेष प्रशिक्षण
  •  संगीत शिक्षकांची नेमणूक 
  •  सीसीटीव्हीची नजर
  •  मोफत बसपास 
  •  मुलींना तायक्‍वाँदो प्रशिक्षण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum Cantonment Increases the number of students due to the activities in the Marathi school