भैरेवाडीची शाळा बनली ‘टॅब स्कूल’

सुनील शेडगे
बुधवार, 22 मार्च 2017

नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे.

नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे.

भैरेवाडी हे तारळे विभागातले गाव. जेमतेम दीडशेच्या घरात लोकसंख्या. त्यातील निम्म्याहून अधिक ग्रामस्थ उपजीविकेसाठी मुंबईला असतात. गाव डोंगर उंचावर वसलेले. गावापर्यंत पोचण्याची वाट अत्यंत खडतर. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १२ विद्यार्थी शिकतात. विजय लिगाडे अन्‌ नितीन सावंत हे शिक्षक कार्यरत आहेत. अलीकडेच गावात यात्रा नियोजनाची बैठक झाली. त्यात जमा झालेल्या लोकवर्गणीच्या रकमेतील २५ टक्के रक्कम ही शैक्षणिक विनियोगासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. उपलब्ध रकमेतून शाळेतील सर्व मुलांना टॅब भेट देण्याचे ठरले.

बैठकीत शिक्षकांनी टॅबचे महत्त्व, त्याचे शैक्षणिक मूल्य, अध्ययन-अध्यापनात होणारा वापर याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी यात्रेत मनोरंजनाच्या कार्यक्रमांना छेद देत ती रक्कम टॅब खरेदीसाठी वापरण्याचे ठरविले. ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक करताना या भागातील भूमिपुत्र अन्‌ ‘बालभारती’चे संचालक डॉ. सुनील मगर यांनी स्वतः एक टॅब शाळेस भेट दिला. ढोरोशी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मगर यांनीही त्यात एका टॅबची भर घातली.

गटविकास अधिकारी किरण गौतम, रामभाऊ लाहोटी, आरती पन्हाळे, केंद्रप्रमुख निवास निकम, आर. पी. गायकवाड, तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत वितरण कार्यक्रम झाला. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यास टॅब देण्यात आला. शिक्षक, ग्रामस्थांच्या या प्रयत्नाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव, गटशिक्षणाधिकारी राजकुमार निकम, विस्तार अधिकारी सी. जी. मठपती आदींनी कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhairewadi school tab school