‘पुनर्जन्मा’नंतरचा पहिला ‘व्हॅलेंटाइन डे’

ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

भवानीनगर - सणसर (ता. इंदापूर) मधील दत्तात्रेय आणि सविता काळे हे दांपत्य ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी पुनर्जन्माचा पहिला वाढदिवस साजरा करेल. मागील वर्षी याच दिवशी कोइमतूरमध्ये पत्नी सविताने दत्तात्रेय यांना आपली किडनी दान केली आणि दत्तात्रेय यांचा जणू पुनर्जन्मच झाला.

भवानीनगर - सणसर (ता. इंदापूर) मधील दत्तात्रेय आणि सविता काळे हे दांपत्य ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी पुनर्जन्माचा पहिला वाढदिवस साजरा करेल. मागील वर्षी याच दिवशी कोइमतूरमध्ये पत्नी सविताने दत्तात्रेय यांना आपली किडनी दान केली आणि दत्तात्रेय यांचा जणू पुनर्जन्मच झाला.

सणसरमधील ही दुसरी कहाणी. लग्नात साताजन्मासाठी बांधलेल्या गाठी आणखी घट्ट करणारी ही कहाणी आहे दत्तात्रेय काळे व सविता काळे या दांपत्याची. वडिलोपार्जित १८ गुंठे शेतजमिनीवर समाधान मानत प्रपंच नेटका करीत असलेल्या दत्तात्रेय यांना मागील वर्षी एका मोफत आरोग्य शिबिरात केलेल्या तपासणीत त्यांना किडनीचा त्रास असल्याचे डॉक्‍टरांनी निदान केले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पुणे गाठले.

तेथील खासगी मल्टिस्पेशालिटी दवाखान्यात त्यांना त्याच दिवशी उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. अल्पभूधारक व चरितार्थाचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या दत्तात्रेय काळे यांना कुटुंबाचे भविष्य डोळ्यासमोर तरळले. ते चिंतेत असतानाच सहचारिणी सविता यांनी त्यांना धीर दिला आणि नातेवाइकांनी कोइमतूर येथील कोवाई दवाखान्याचा पत्ता दिला. 

भवानीनगर येथील डॉ. संग्राम देवकाते यांनीही त्यांना पाठबळ दिले आणि दोन वर्षांपूर्वी प्रमोद निंबाळकर यांनाही त्यांच्या पत्नीनेच दिलेली किडनी याची आठवण करून दिली. त्यानंतर दोघेही कोइमतूर येथील दवाखान्यात दाखल झाले. त्यांच्यावर चाचण्या झाल्या. दोघेही ए-पॉझिटिव्ह या रक्तगटाचे असल्याने डॉक्‍टरांनी सविता यांचीच किडनी जुळेल असे सांगितले आणि अवांतर खर्च वाचला. दोघांवरही शस्त्रक्रिया झाली.

व्हॅलेंटाइन डे दिवशी १४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली प्रक्रिया महाशिवरात्रीच्या दिवशी २४ फेब्रुवारी २०१७ रोजी संपली. दोघेही समाधानी होते. आज दोघेही समाधानी आहेत. कोणीच काही गमावलेले नाही अशाच थाटात हे दांपत्य असते. आपल्या मुलांच्या आयुष्यात नवचैतन्य फुलविण्यासाठी आता दोघेही पूर्ण परीने काम करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhavaninagar news pune news kidney donate life saving valentine day