‘भूमी’ म्हणते स्पीक आउट

सागर शिंगटे
सोमवार, 11 मार्च 2019

पिंपरी - आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम संचलित मातृसेवा विद्यामंदिरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजी लिखाण-वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी भूमी स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘लिटल आइन्स्टाईन’ आणि ‘स्पीक आउट’ प्रकल्प राबविले जात आहेत; तसेच निराधार-अनाथ मुलांच्या इच्छापूर्तीसाठीही भूमीचे स्वयंसेवक धडपड करत आहेत.

पिंपरी - आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम संचलित मातृसेवा विद्यामंदिरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजी लिखाण-वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी भूमी स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘लिटल आइन्स्टाईन’ आणि ‘स्पीक आउट’ प्रकल्प राबविले जात आहेत; तसेच निराधार-अनाथ मुलांच्या इच्छापूर्तीसाठीही भूमीचे स्वयंसेवक धडपड करत आहेत.

भूमी स्वयंसेवी संस्था मूळची चेन्नईची. तिचे देशभरात १४ शहरांमध्ये १२ हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या गणित-इंग्रजी विषयांमध्ये सुधारणा करण्यासाठी संस्थेकडून कृतिशील अध्यापनावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला जात आहे. संस्थेतर्फे नचिकेत बालग्राम, देहूरोड येथील सेंट जॉर्ज स्कूल येथे विविध उपक्रम आणि प्रकल्प राबविले जात आहेत.

भूमीचे केंद्र समन्वयक विनीत सुंकरवार म्हणाले, ‘‘पर्यावरण संवर्धन, वाहतूक प्रबोधन, पशुल्याण, वृक्षारोपण क्षेत्रात संस्था मुख्यत्वे कार्यरत आहे. अनाथाश्रम, बालकाश्रम, सरकारी शाळांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत करतो. आकुर्डीतील नचिकेत बालग्राम संचलित मातृसेवा विद्यामंदिरामध्ये २०१२ पासून माझ्यासह विशाल पाटील, अक्षय महाजन, रितू कुंभानी, अपूर्व श्रीवास्तव, आकाश करंजकर, अभिषेक कुमार गणित-इंग्रजी अध्यापनाचे काम करत आहेत. चौथी ते सहावीपर्यंतच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांसाठी ‘लिटल आइन्स्टाईन’ आणि ‘स्पीक आउट’ प्रकल्प राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना दर शनिवारी गणित आणि इंग्रजी शिकवितो, तसेच वर्षातून एकदा नक्षत्र हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव, ‘जॉय द वर्ल्ड’ यासारखे उपक्रमही राबविले जातात. मुलांना शिकविताना आमच्या प्रत्येक स्वयंसेवकाला नवीन शिकायला मिळत आहे. आमच्या स्वयंसेवकांतही नेतृत्व, व्यवस्थापन कौशल्य यासारखे गुण विकसित होत आहेत.’

मुलांच्या इच्छापूर्तीचेही प्रयत्न
निराधार, अनाथ मुलांच्या इच्छाही भूमीचे स्वयंसेवक जाणून घेतात व ती पूर्ण केली जाते. नवीन कपडे, दप्तरे, बूट आदी गोष्टी पूर्ण करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून आर्थिक मदत घेतली जाते. देशात इतर ठिकाणी ‘कानिणी’ (संगणक), ‘लक्ष्य’ (जीवनशैली विकास), ‘डी-स्टेप’ (नृत्य), यंत्रा (रोबोटिक्‍स) आदी प्रकल्प राबविले जातात.

‘भूमी’चे स्वयंसेवक समर्पित वृत्तीने मुलांना शिकवीत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत.
- रमेश मोहनापुरे, व्यवस्थापक, नचिकेत बालग्राम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhoomi Organisation Teaching Student Motivation