वनभाज्या उत्सवातून साधली जैवविविधता नोंदणी 

नीला शर्मा 
Tuesday, 19 May 2020

भाज्यांचा स्वयंपाकातील उपयोग,पोषक व औषधी गुणधर्मांचा माहिती तसंच जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून नोंदणी असे तिहेरी हेतू यातून आनंददायी पद्धतीने साधले जात आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील कंजाला या गावाच्या परिसरात भरवला जाणारा "वनभाज्या उत्सव' हा विस्मृतीत गेलेल्या भाज्यांची माहिती लोकांना करून देणारा मौलिक उपक्रम ठरत आहे. भाज्यांचा स्वयंपाकातील उपयोग, पोषक व औषधी गुणधर्मांचा माहिती तसंच जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून नोंदणी असे तिहेरी हेतू यातून आनंददायी पद्धतीने साधले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आदिवासी वर्षानुवर्षे राहात असलेल्या अनेक भागांमध्ये काळाच्या ओघात पारंपरिक माहिती लोप पावत चाललेली आहे. हे लक्षात घेऊन "सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट' अर्थात "योजक' या नावाने कार्यरत संस्थेने नंदुरबार जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वी एक उपक्रम सुरू केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वनभाज्या उत्सव या कल्पकतेने आखलेल्या या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी जोड मिळाली ती कंजाला गावातील एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळाची. योजकचं काम बघणारे कपिल सहस्रबुद्धे म्हणाले, ""जनजातींमधील खाण्यात पूर्वी स्थानिक वनभाज्या असायच्या. त्यांतील पोषक व औषधी गुणधर्म त्यांना माहीत असायचे. आधुनिक काळात याबद्दलच्या विसरल्या गेलेल्या माहितीची पुन्हा ओळख गरजेची आहे. नर्मदेकाठच्या या भागात तीन-चार गावांतील महिलांना श्रावण-भाद्रपदात विशिष्ट दिवस ठरवून एकत्र आणलं जातं. या महिला शिजवलेल्या व मूळ स्वरूपातील रानभाज्या आणतात. प्रदर्शनातून त्याबद्दल माहिती सांगितली जाते. याला पारंपरिक आदिवासी गाणी, वाद्यं, नृत्य आदींची जोड असते. आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावांमधील तरुण, विद्यार्थी व महिलांना यासाठी निमंत्रण दिलं जातं. माहितीची देवाणघेवाण होते.'' 

सहस्रबुद्धे यांनी असंही सांगितलं की, या माध्यमातून जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत नव्वद भाज्यांची नोंदणी या उत्सवातून झाली आहे. त्यांची नावं, माहिती व पाककृतींची एक माहितीपुस्तिका सहभागी महिलांच्या प्रयत्नांमधूनच साकार झाली. आता हा उत्सव जिल्हा पातळीवर होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, या स्वरूपातील उपक्रम आठ ते दहा राज्यांमध्ये होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चाललेल्या कुपोषणावर एक उपाय म्हणून या वनभाज्यांकडे लक्ष वेधायला हवं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biodiversity registration achieved through the Vegetable Festival