लग्नात आहेर म्हणून स्वीकारलेली पुस्तके दिली वाचनालयाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

एक नजर

  • ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील सचिन यांचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह. 
  • लग्नात स्वीकारला पुस्तकरूपी आहेर. 
  • ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने दिली ढोलगरवाडी येथील वाचनालयाला भेट. 

कोवाड - ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील असलेल्या सचिनचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या लग्नात पुस्तकरूपी स्वीकारलेला आहेर शर्वरीने माहेरच्या लोकांकडे सुपूर्द करून वेगळा आदर्श घातला आहे. ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने ढोलगरवाडी येथील वाचनालयाला भेट दिली.

ढोलगरवाडी येथील अरुण महादेव पाटील यांची कन्या शर्वरी व मूळचा सोलापूरचा पण सध्या पुण्यात वास्तव्याला असलेला सचिन वकिली व्यवसाय करत विविध सामाजिक उपक्रमांतून माणूसकी जोपतोय. सामाजिक संवेदना उराशी बाळगून जाणिवांचे बंध घट्ट करणाऱ्या सचिनने २६ जानेवारी२०१९ रोजी शर्वरी बरोबर सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. लग्नसमारंभात बडेजाव न करता साध्या पध्दतीने विवाह केलेल्या या नवदांपत्याने पुस्तकरूपी आहेर स्वीकारला. त्यामुळे लग्नात पै-पाहुणे, मित्रमंडळी व नातेवाईकांनी पुस्तकांचा आहेर दिला.

विविध विषयांची तब्बल ४०० पुस्तके जमा झाली. दोघांनीही गावातील वाचनालयाला ही पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला. ढोलगरवाडी येथील वाचनालयाला पुस्तकांची भेट दिली. विजय नौकुडकर, गणपती पाटील, कल्लापा पाटील यांनी ही पुस्तके स्विकारली. गावतर्फे या नवदांपत्याचे आभार मानन्यात आले.

दरम्यान, कडलगे गावचे पोलिसपाटील राजेंद्र पाटील यांनी वाचनालयाला दिलेली पुस्तके सुरक्षित रहावीत म्हणून ८ हजाराचे लोखंडी कपाट भेट दिले. याबद्दल त्याचाही सत्कार झाला. कार्यक्रमाला उपसरपंच कल्लापा पाटील, तानाजी पाटील, एन. एन. पाटील, तानाजी तुपारे, गावडू पाटील, आर. जी. पाटील, आर. डी. पाटील, विलास पाटील, सुनील सप्ताळे, शिवाजी तुपारे, एस. जे. पाटील उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book accepted in Marriage given to Library