#WednesdayMotivation : बहिणीच्या किडनीने भावाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

येथील रूपाली सोनवणे (वय ३५) यांनी भावाला स्वतःची किडनी दिल्याने भावासाठी त्या जणू देवदूतच ठरल्या आहेत. विकी गांगुर्डे (वय २४, रा. पिंपळगाव बसवंत) गरीब कुटुंबातील असून तो नेहमी आजारी राहत असल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी तपासणी करून किडनी फेल असल्याचे सांगितले. विकीला दुसरी किडनी बसल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी किडनी मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

लखमापूर - येथील रूपाली सोनवणे (वय ३५) यांनी भावाला स्वतःची किडनी दिल्याने भावासाठी त्या जणू देवदूतच ठरल्या आहेत. विकी गांगुर्डे (वय २४, रा. पिंपळगाव बसवंत) गरीब कुटुंबातील असून तो नेहमी आजारी राहत असल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी तपासणी करून किडनी फेल असल्याचे सांगितले. विकीला दुसरी किडनी बसल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी किडनी मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. किडनी बसवण्यासाठी दवाखान्यात चौकशी केल्यावर त्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर कुटुंबीयांचा धीर खचला. तरीही त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न सुरू ठेवले. 

एवढी मोठी रक्कम कोठून आणणार, या विचाराने त्यांची बहीण रूपाली सोनवणे (लखमापूर, ता. दिंडोरी) हिच्यासह घरातील सदस्य व इतर नातेवाइकांनी स्वतःची किडनी देण्याचा विचार केला. मात्र, कुटुंबीयांची शारीरिक तपासणी केली असता, फक्त बहीण रूपाली हिचा रक्तगट व इतर बाबी जुळत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. रूपाली पती व सासरच्या नातेवाइकांचा विचार घेऊन किडनी देण्यास तयार झाली. थोड्याच दिवसांत तिने आपली किडनी भावाला उदारमनाने व स्वतःचा काहीही विचार न करता दिली. डॉक्‍टरांचे प्रयत्नही यशस्वी झाले व भावाला जीवदान दिले. भाऊ आज सुखात जीवन जगत आहे.

रूपालीच्या धाडसाने माहेर, सासर व परिसरात कौतुक होत आहे. या धाडसाची दखल घेऊन लखमापूरच्या सरपंच मंगल सोनवणे व माजी सरपंच वर्षा सोनवणे यांनी नुकताच रूपाली सोनवणे यांचा सत्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother Kidney Donate by Sister Life Saving Humanity Motivation