टायपिंग व्यवसायातून शोधला नवा मार्ग

गोपाल हागे
रविवार, 9 जुलै 2017

सौ. शोभा अरविंद इंगळे यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण केले. अाज घर सांभाळून शोभाताईंनी टायपिंग व्यवसायातून नवा मार्ग शोधला. याच बरोबरीने चार एकर जिरायती शेतीमध्येही त्यांचे बदलाचे प्रयत्न सुरू आहेत.

महिलांनी ठरविले तर त्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे अनेक जणींनी दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलेने मोताळा (जि. बुलडाणा) येथे टायपिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले अाणि गेली २६ वर्षे त्या हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत अाहेत. शोभाताई आणि अरविंद इंगळे हे दाम्पत्य बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या शिराढोण या गावचे. या दोघांचा १९९० साली विवाह झाला. कुटुंबाकडे चार एकर शेती, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शेतीच्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नव्हता. अापण काहीतरी व्यवयास केला पाहिजे म्हणून त्यांनी काहीच महिन्यात शिराढोण सोडण्याचा निर्णय घेतला. मोताळा (जि. बुलडाणा) येथे नांदुरा मार्गावर जागेची निवड करून तेथे व्यावसायिक गरजेचा अंदाज घेत टायपिंग सेंटर सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करून टायपिंग सेंटरची सुरवात केली. सन १९९७ पर्यंत त्यांचे टायपिंग सेंटरच होते. त्यानंतर याच व्यवसायाला त्यांनी झेरॉक्स, स्क्रीन प्रिंटिंगची जोड दिली. स्थानिक पातळीवर ही व्यवस्था झाल्याने परिसरातील गावामधील लोकांना याचा चांगला फायदा झाला. 
  
स्वतः घेतले प्रशिक्षण 
कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्यामध्ये निपुणता यायला हवी. शोभाताईंचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. टायपिंग सेंटर सुरू करण्याबरोबरीने त्या स्वतः टायपिंग शिकल्या. पूर्वीच्या काळी नोकरीसाठी टायपिंग करता येणे हे फार महत्त्वाचे होते. त्यामुळे शिकणाऱ्यांची संख्याही भरपूर होती. परंतु गेल्या काही वर्षांत टायपिंगची जागा संगणकाने जशी घेतली तसे टायपिंग व्यवसायाचे दिवस फिरले. मात्र शोभाताईंनी काळाची पावले अोळखून व्यवसायात बदल केला. दररोज बुलडाणा येथे जाऊन त्यांनी संगणक प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या केंद्रावर त्यांनी  संगणक शिकविण्यास सुरवात केली. अाज त्या स्वतः मार्गदर्शिका म्हणून या केंद्राचा कारभार सांभाळतात. टायपिंगचा सहा महिन्यांचा कोर्स असतो. प्रत्येक बॅचला सरासरी ५० ते ६० विद्यार्थी असतात. वर्षभरात किमान १५० विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन  करतात. गेल्या २५ वर्षांत किमान अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या सेंटरवरून टायपिंगचे प्रशिक्षण घेतले. अाता गाव परिसरातील मुलेही संगणक साक्षर होत अाहेत. त्यामुळे अाज मोताळा तालुक्यात ‘पुष्पा’ टायपिंगची वेगळी अोळख तयार झाली अाहे.

मुलांना केले उच्चशिक्षित 
अरविंद इंगळे हे दहावी, तर सौ. शोभाताई बारावीपर्यंत शिकलेल्या. शिक्षण पदवीपर्यंतही झालेले नसले तरी त्यांनी मुला मुलींना मात्र शिक्षणात कुठेही मागे ठेवले नाही. मुलगा विशाल हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. मुलगी अंकिता ही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. अापल्याला न मिळालेले उच्चशिक्षण त्यांनी मुलांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यासाठी अपार कष्ट घेतले आहेत.

कुटुंबाची साथ मोलाची  
व्यवसायातील यशासाठी सातत्य अाणि चिकाटी हवी असते. शोभाताईंनी हे गुण कायम जोपासले. त्यांच्या दिवसाची सुरवात पहाटे पाच वाजता होते. घरातील सर्व कामे पूर्ण करून त्या सकाळी दुकानात पोचतात. त्यांच्या या प्रयत्नांना पतीची कायम साथ मिळालेली अाहे. कुटुंबीयांनी केलेली मदत, पाठबळामुळेच इतके वर्षे हा व्यवसाय सांभाळता अाल्याचे त्या अावर्जून सांगतात. अशा प्रकारे ग्रामीण भागात महिलेने पारंपरिक व्यवसायाला फाटा देता टायपिंग आणि संगणक प्रशिक्षणासारख्या वेगळ्या व्यवसायामध्ये पाय रोवले. काळानुरूप व्यवसायात बदलही केला. मुलगा व मुलीला उच्चशिक्षण देऊन त्यांना सन्मानाचे स्थानही मिळवून दिले आहे.

शेतीमध्येही होताहेत बदल 
शोभाताईंनी २५ वर्षात टायपिंग, संगणक प्रशिक्षण व्यवसायात चांगला जम बसवला आहे. त्याचबरोबरीने  शिराढोण गावी असलेली चार एकर जिरायती शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. स्वतः दैनंदिन शेतीकडे लक्ष देणे शक्य नसल्याने शेती पडीक न ठेवता त्यांनी कुटंबातीलच एका सदस्याला शेती वाट्याने दिली आहे. तेथे कापूस, तूर, सोयाबीन लागवड असते. आता एक एकर शेतीला ठिबक सिंचन केले आहे. गावी गेले की पीक नियोजन आणि शेती विकासावर त्यांचे लक्ष असते.  

सौ.शोभा इंगळे, ०७२६७-२४५४१२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldhana news business agriculture women