कर्करोग होऊनही समाजासाठी ‘ती’ गर्क

सुवर्णा नवले
Thursday, 12 March 2020

महिलांमध्ये कोणत्याही आजारावर मात करण्याची तयारी हवी. जिद्द आणि चिकाटी असल्यास सर्व काही शक्‍य असतं. आजारपणात मला मुलगा अमर व पतीनेही साथ दिली. सकारात्मक जगायला हवं. आजारपणाचा न्यूनगंड बाळगता कामा नये. सध्या मी स्तन कर्करोगावरही प्रबोधन सुरू केले आहे. सोबतच अंनिसच्या माध्यमातून जेवढे शक्‍य होईल तेवढे काम करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पुढेही हे काम असेच सुरू राहील. 
- शुभांगी घनवट

पिंपरी - स्तनाचा कर्करोग होऊनही त्याचा बाऊ न करता आजही त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत (अंनिस) नेटाने काम करीत आहेत. उपचारादरम्यान न डगमगता त्या कुटुंबाचा आधार बनून सक्षमपणे उभ्या आहेत. आंतरजातीय विवाह करून त्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. जातीय तिढ्याला मूठमाती दिली. उपचारानंतर आजही त्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रियपणे काम करीत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शुभांगी घनवट यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील वडूज. लग्नानंतर त्या चिंचवड येथील बिजलीनगर येथे राहत आहेत. नरेंद्र दाभोळकरांपासून त्यांनी व कुटुंबीयांनीही प्रेरणा घेतली. गेल्या १५ वर्षांपासून त्या अंनिसमध्ये विविध उपक्रम राबवीत आहेत. पिंपरी-चिंचवड शाखेच्या त्या पाच वर्ष कार्याध्यक्ष होत्या. त्यांना या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘शतकवीर’, ‘कृतज्ञता’ व ‘आधारस्तंभ’ असे पुरस्कार मिळाले आहेत. नरेंद्र दाभोळकरांच्या गावचा जन्म असल्याने त्याचा त्यांना अभिमान आहे. २०१९ मध्ये त्यांच्या चार केमोथेरपी झाल्या. त्यानंतर डोक्‍यावरचे केस पूर्ण गेले होते. तरीही कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता समाजात ताठमानेने जगत आहेत. त्यांच्यावरचे उपचार सध्या पूर्ण होऊन त्या बऱ्या झाल्या आहेत.

सध्या त्या पिंपरी-चिंचवडमध्ये अंनिसच्या बैठकांचे आयोजन करणे. घरोघरी पत्रकांचे वाटप करणे. अहवाल बनविणे. वार्तापत्रांचे वाटप करणे. नवीन सभासद जोडणे. 

ज्येष्ठांचे संघ व बचत गटांच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचे काम त्यांनी हाती घेतले आहे. तसेच ‘फटाके मुक्त दिवाळी’, ’होळी करा लहान, पोळी करा दान,’ सर्प प्रबोधन, गणपती मूर्ती दान, महिला सक्षमीकरण तसेच आंतरजातीय विवाह या विषयांवर प्रबोधन करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cancer shubhangi ghanwat social work motivation