चंद्रपूरच्या रोहित दत्तात्रयची गरुडझेप

नरेंद्र चोरे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नागपूर - केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर क्रिकेटला पोषक वातावरण नसलेल्या चंद्रपूर शहरातील रोहित दत्तात्रयने 16 वर्षे मुलांच्या विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करून भारतात "नंबर वन' गोलंदाज बनण्याचा मान मिळविला. रोहितमधील गुणवत्ता व समर्पणवृत्ती बघता तो चंद्रपूरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला, तर नवल वाटू नये. खंबीरपणे त्याच्या पाठीशी असलेल्या परिवारालाही त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास आहे.

रोहितने मंगळवारी संपलेल्या 16 वर्षांखालील मुलांच्या विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये तब्बल 34 विकेट्‌स मिळवून विदर्भाला तिसऱ्यांदा बादफेरीत प्रवेश मिळवून दिला. साखळी फेरीत सर्वाधिक विकेट्‌स घेणारा तो भारतातील एकमेव गोलंदाज ठरला. फिरकीपटू असलेल्या 15 वर्षीय रोहितने मध्य प्रदेशविरुद्ध सात बळी, राजस्थानविरुद्ध नऊ, उत्तर प्रदेशविरुद्ध सात आणि छत्तीसगडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 11 गडी बाद करून विदर्भाला मध्य विभागात "चॅम्पियन' बनविले.

चंद्रपूर येथील युथ क्रिकेट असोसिएशनमध्ये (वायसीए) शैलेंद्र भोयर आणि कार्तिक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविणाऱ्या रोहितने अकराव्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मोठ्या भावासोबत (यश) कॅम्पमध्ये जात असताना एकदिवस रोहितलाही क्रिकेटचा लळा लागला. प्रशिक्षकांनी त्याच्यातील टॅलेंट हेरल्यानंतर रोहितची थेट व्हीसीए संघात "एंट्री' झाली. 12 वर्षांचा असताना रोहितला 14 वर्षांखालील राजसिंग डुंगरपूर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात 10 गडी बाद करून त्याने आपल्यातील "टॅलेंट'चा परिचय करून दिला. एनसीएत झालेल्या स्पर्धेतही त्याने लक्ष वेधून घेतले.

वैविध्य, अचूक टप्पा आणि लाइन व लेंथ रोहितची जमेची बाजू असून गुगली आणि फ्लिपर त्याचे प्रमुख अस्त्र आहे. विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकत असलेल्या रोहितमध्ये संयमही खूप आहे. शेन वॉर्न व अनिल कुंबळेला आदर्श मानणाऱ्या रोहितचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न आहे. त्या दिशेने त्याची वाटचालही सुरू आहे. रोहितचे वडील राजेश चंद्रपूरच्या साईबाबा बी. एड. कॉलेजमध्ये "लेक्‍चरर' असून, आई अपर्णा गृहिणी आहेत. मुलाला घडविण्यासाठी अपर्णा यांनी "जॉब'वर पाणी सोडलंय, हे उल्लेखनीय.

दिग्गजांकडून मिळविली वाहवा
बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असताना रोहितच्या गोलंदाजीची अनेकांनी स्तुती केली. यात एकेकाळी वेस्ट इंडिजची दाणादाण उडविणारे माजी लेगस्पीनर नरेंद्र हिरवाणी, यष्टीरक्षक किरण मोरे आणि आशीष कपूरचा समावेश आहे. विजय मर्चंट व राजसिंग डुंगरपूर ट्रॉफीच्या वेळीसुद्धा त्याने अनेक दिग्गजांकडून वाहवा मिळविली.

""रोहितने केलेल्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याने कामगिरीतील सातत्य यापुढेही कायम ठेवावे, अशीच आमची इच्छा आहे. भारतीय संघात स्थान मिळविणे त्याचे स्वप्न असून, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याला सर्वतोपरी सहकार्य करू.''
-राजेश दत्तात्रय (रोहितचे वडील)

Web Title: Chandrapur rohit dattatraya