साथी हाथ बढाना... संवेदनशील तरुणाईचे श्रमदान!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

उत्स्फूर्त सहभाग
‘साथी हाथ बढाना’ या भावनेने कोणताही पूर्वपरिचय नसताना अनेकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून आपल्या संवेदनशील वृत्तीचा परिचय दिला. तरुणाईने केलेल्या मोठ्या प्रमाणातील स्वच्छतेने परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून देण्यासाठी येथील नीर फाउंडेशनतर्फे आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मेहरुण तलाव परिसरात श्रमदान करून जळगावच्या तरुण-तरुणींनी नवी पिढी कृतिशील असल्याची साक्ष दिली.

सकाळी सात ते नऊ या कालावधीत झालेल्या श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कॅरी बॅग्ज, थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिसचे तुकडे असा प्रचंड कचरा संकलित करण्यात आला. कोणत्याही व्यक्तिगत निमंत्रणाशिवाय केवळ समाज माध्यमातून फिरलेला नीर फाउंडेशनचा एक संदेश वाचून अनेक जण सकाळी श्रमदानासाठी आले होते.

नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन, नीलेश जोशी, भावेश रोहिमारे, डॉ. महेंद्र काबरा, प्रदूमन बोरसे, सुयोग नेवे, प्रशांत नारखेडे, विनोद वलेचा, रवींद्र सपकाळे, गोपाळ निकम, विजय तुलसी, पवन महाजन, नीलेश निंबाळकर, परेश कोळी, रोहित सोनवणे, आयुषी कामदर, गणेश घुले, प्रियांका कुकरेजा, डॉ. कल्पेश गांधी यांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning Campaign by Nir Foundation Youth Motivation Initiative