स्वच्छ सर्वेक्षणात रहिमतपूर देशात ३८ वे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

रहिमतपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगर परिषदेचा देशात ३८, राज्यात ३४ व जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे. 

रहिमतपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगर परिषदेचा देशात ३८, राज्यात ३४ व जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे. 

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगरपरिषदेने एकूण पाच हजार गुणांपैकी तीन हजार ४४० गुण प्राप्त केले. संपूर्ण देशामध्ये पश्‍चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पहिल्या शंभर मानांकन शहरांमधून रहिमतपूर नगरपरिषदेने ३८ वा, तर सातारा जिल्ह्यातून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष चाँदगणी आतार, पदाधिकारी, सर्व सदस्य, आरोग्य अभियंता, सर्व नगरपालिका कर्मचारी, आराध्या इन्फ्रास्ट्रक्‍चरचे संचालक दत्तात्रय राणे व त्यांची सर्व टीम, विविध सेवाभावी संस्था, पंचक्रोशी शिक्षण मंडळ, पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, आदर्श शिक्षण संस्था, श्री चौंडेशवरी शिक्षण संस्था, हिंद वाचनालय रहिमतपूर, (कै.) उमाताई कानेटकर वाचनालय, रहिमतपूर विभाग पत्रकार संघ, विविध बचत गटांतील महिला, व्यापारी संघटना रहिमतपूर व दुर्गोत्सव मंडळे, गणेशोत्सव मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळे, नागरिकांच्या सांघिक प्रयत्नामुळे देशपातळीवर स्वच्छतेची गगनभरारी घेतल्यामुळे रहिमतपूरकरांची मान देशात गर्वाने उंचावली आहे.

पालिकेच्या इतिहासात देशपातळीवर हा बहुमान मिळवण्याची ही पहिलीच ऐतिहासिक वेळ आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमाच्या गुणप्राप्तीमध्ये शहर स्वच्छतेच्या सेवास्तर प्रगती, वाहतूक प्रक्रिया, कचऱ्याची विल्हेवाट, शहरांची अंतर्गत स्वच्छता, नावीन्यपूर्ण उपक्रम, महिलांच्या खासगी वैयक्तिक आरोग्यासाठी पिंक रिक्षा, माहिती, क्षमता बांधणी (आयईसी ॲक्‍टिव्हिटी), तारांकित मानांकन प्रमाणपत्र, ओडिएफ प्लस प्रमाणपत्र, थेट निरीक्षण, सामुदायिक स्वच्छता शौचालय, सार्वजनिक शौचालय स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, नागरिकांचा अभिप्राय वर्गीकरण जनजागृती या निकषांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. आता यानंतर नागरिकांच्या सहभागातून शहरातील स्वच्छता कायम टिकून राहण्यासाठी व अधिक जोमाने काम करत राहण्यासाठी यापुढेही अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात समस्त नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही रहिमतपूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning Survey Rahimatpur Success