तीन तासांत २३७ टन कचरा गोळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला.

पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १२) ही मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता मोहिमेची सुरवात सारसबाग येथून करण्यात आली. या वेळी महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक उपस्थित होते. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये प्रतिष्ठानच्या सुमारे चार हजार सदस्यांनी सहभाग  घेतला. गोळा करण्यात आलेला कचरा महापालिकेकडे सुपूर्त करण्यात  आला. रस्ते, शासकीय कार्यालये, दवाखाने, पोलिस स्टेशन व त्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. विविध शहर पातळीवरील अधिकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेऊन प्रोत्साहन दिले.

स्वच्छता राखणे हे सामाजिक कर्तव्य
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची गरज असल्याचे नमूद करून डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, ‘‘कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबरोबरच आजार पसरतात. अस्वच्छ वातावरणामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण होते. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर केला पाहिजे. स्वच्छता राखणे हे माझे सामाजिक कर्तव्य आहे, असे प्रत्येकाने मानले पाहिजे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collect 237 tonnes of garbage in three hours