
कोरोनाकाळात तिने केले घर आर्थिक सक्षम
पुणे - कोरोना काळात अनेकांच्या रोजगारावर गदा आली. त्यामुळे नोकरदार असो किंवा व्यावसायिक सर्वच हैराण झाले होते. अनेक महिलांना या संकटाचा सामना करावा लागला. मात्र या सर्व स्थितीला पुण्यातील सुवर्णा किशोर रसाळ या अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या स्वामी समर्थ गिफ्ट आर्टिकल्स या स्टार्टअपच्या माध्यमातून दरमहा तीन हजारहून अधिक पीओपी पुतळे तयार केले. त्यामुळे झालेल्या आर्थिक उलाढालीतून त्यांनी एकटीने त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम केले आहे.
सुवर्णा यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि नर्सिंगमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी स्थानिक नर्सिंग होममध्ये काम करण्यास सुरवात केली. लग्नानंतर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह नोकरी करणे खूपच मुश्कील झाले होते. त्यामुळे घरगुती व्यवसाय सुरू करायचा असे त्यांनी ठरवले. ज्यातून त्यांच्या घरातील सदस्यांच्या आर्थिक आणि भावनिक गरजा पूर्ण होतील, अशी त्यांची भावना होती. सुवर्णा यांचे पती स्कूल व्हॅनचालक आहेत. नोकरी करताना पत्नीची होत असलेली धावपळ त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पत्नीला नर्सिंगची नोकरी सोडून पीओपीच्या पुतळ्याच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. पुतळा बनवण्याचे सुरवातीचे ज्ञान आणि प्रशिक्षणही त्यांनी दिले.
हेही वाचा: भजी व चहा विक्रीचे काम केलेले आलताफ बनले आयपीएस
गणपती, राधा-कृष्ण, बुद्ध, शिवाजी महाराज यांचे पुतळे ते बनवतात. त्यांनी तयार केलेल्या पुतळ्यांची सध्या पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि राज्यातील इतर भागात विविध डीलर्स आणि वितरकांना घाऊक तत्त्वावर विक्री केली जात आहे. या प्रवासात त्यांना हर अँड नाऊच्या उद्योजकता समर्थन कार्यक्रमाची मदत झाली.
मी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीला मला बाजारातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला दरमहा काही ठराविकच ऑर्डर मिळत होत्या. मात्र कालांतराने मला अनुभव आल्याने बाजारातील मागणी आणि नवीन ट्रेंडच्या आधारे माझ्या एंटरप्रायझेसच्या पुतळ्यांना मागणी वाढली.
- सुवर्णा रसाळ, संस्थापक, स्वामी समर्थ गिफ्ट आर्टिकल्स
Web Title: Corona Period Home Economic Suvarna Rasal Motivation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..