नगरसेविकेच्या पुढाकाराने घाणीत फुलले नंदनवन!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

तुर्भे - केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत चार कोटी ५० लाख खर्च करून नवी मुंबईत हरितपट्टा विकसित करण्यासाठी लावलेल्या रोपांचे योग्य जतन केले जात नसल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती आहे. मात्र दुसरीकडे ओसाड, डेब्रिज व कचराकुंडीच्या जागेत अमृत योजनेंतर्गत रोपांची लागवड करून नंदनवन फुलवण्याचे काम नगरसेविका दीपाली संकपाळ यांनी केले आहे.  

घणसोली सेक्‍टर ९ मधील नाल्याशेजारी बाराही महिने घाण व कचऱ्याचे साम्राज्य असते. भटकी कुत्री, साप, विंचू याचीही भीती असते. अशा ठिकाणी नंदनवन फुलवणे म्हणजे दगडाला पाझर फोडल्यासारखे आहे; मात्र घाणीत नंदनवन फुलविण्याचे हे काम नगरसेविका संकपाळ यांनी केले आहे. सेक्‍टर ९ मधील नाल्याशेजारील त्यांनी अमृत योजनेतून आतापर्यंत तीन हजार रोपांची लागवड करून ओसाड भागात बगीचा फुलवला आहे. येथे चार हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट असून, या महिन्याच्या अखेरीस ते पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रातर्फे २०१५ ते २०१८ या तीन वर्षांसाठी अमृत योजना मंजूर केली आहे. यात केंद्र सरकारचा ५० टक्के आणि महापालिका व राज्य सरकारचा प्रत्येकी २५ टक्के निधी आहे. यातून शहरात अनेक ठिकाणी हरितपट्टा विकसित करण्याचे काम सुरू आहे. वाशी, सानपाडा, नेरूळ व घणसोली विभागात सध्या हरितपट्टा विकसित करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने या कामासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. वर्षभरासाठी झाडांची जबाबदारी त्याच्यावर दिली आहे.

सुपारी, नारळाचीही झाडे
घणसोलीत नाल्याशेजारी हरितपट्टा विकसित केला आहे. येथील कामावर पालिकेच्या उद्यान विभागापेक्षा नगरसेविका संकपाळ यांनीच अधिक लक्ष घातल्याने ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेंतर्गत सुपारी, नारळ, रुद्राक्ष, बेल, पारिजातक, पळस व फळझाडांची लागवड केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात येथे वॉकिंग ट्रॅक व पाण्याचा निचरा होण्यासाठीची कामे केली जातील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporator initiative full flower paradise