देशातील पहिली "बॅटमोबिल टम्बलर' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

बॅटमोबिल कार ही सुपरहिरो "बॅटमॅन' चित्रपटातील संकल्पना असून, तरुणवर्गात या संकल्पनेविषयी आकर्षण आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची किमया पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे - बॅटमोबिल कार ही सुपरहिरो "बॅटमॅन' चित्रपटातील संकल्पना असून, तरुणवर्गात या संकल्पनेविषयी आकर्षण आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची किमया पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे. हॅण्डमेड प्रकारातील ही देशातील पहिलीच बॅटमोबिल टम्बलर कार असल्याचे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शकांनी सांगितले. 

झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांनी 55 दिवसांत "बॅटमोबिल टम्बलर' कारची निर्मिती केली आहे. अशी माहिती विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अमोल उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्राचार्य डॉ. अजित काटे, प्रा. जयेश काटकर, प्रवीण परीट, प्रदीप खांडवे, विवेक गुरव, प्रवीण लेंडवे आदी उपस्थित होते. 

डॉ. उबाळे म्हणाले, ""बॅटमोबिल डिझेल कार ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते. तिला 98 सीसी क्षमतेचे इंजिन आहे. कारला अपघात होऊन चालक जखमी होऊ नये यासाठी कारमध्ये "लो ग्राउंड क्‍लीअरन्स'चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रेक दाबताच गाडी वेगाने पुढे न जाता जागीच थांबते.'' 

व्हेइकल व्हिजन सिस्टीम  
कारच्या सुरक्षेच्या दृष्टीने "व्हेइकल व्हिजन सिस्टीम' (व्हीव्हीएस) ही यंत्रणा वापरली आहे. त्यासाठी कारच्या चारी बाजूला चार कॅमेरे लावून कॅमेराद्वारे आलेले चित्रण वाहनाच्या दृश्‍य यंत्रणेत (व्हीव्हीएस) दिसते. त्यामुळे रात्रीच्या वेळेला चालकाला प्रकाशामुळे त्रासही होणार नाही आणि अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल, असेही डॉ. उबाळे यांनी सांगितले. या कारची निर्मिती सिद्धेश शिंदे, शुभम कुदळे, विवेक गुरव आणि वेदांत जगताप या विद्यार्थ्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country first batmobil tumbler

टॅग्स