न्यायालयातील लिपिक ते न्यायाधीश!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

विक्रोळी - सर्वसामान्य नागरिकांना न्याय देता यावा, त्यांच्यात न्यायालयाप्रती विश्‍वास निर्माण व्हावा आणि आपण तो कधीतरी देऊ, असे स्वप्न पाहिलेल्या ३७ वर्षांच्या विश्‍वनाथ शेट्टी यांना आता प्रत्यक्षात न्यायदान करता येणार आहे. विक्रोळी दंडाधिकारी न्यायालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या शेट्टी यांनी जिद्दीने न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. आता त्यांची दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी पदावर निवड झाली आहे. लोकल प्रवासादरम्यान अभ्यास करून लिपिकापासून जजपर्यंत झेप घेणाऱ्या शेट्टी यांचे कौतुक होत आहे.

सोलापूरवरून मुंबईत आलेल्या शेट्टी यांचे वडील सोलापूर जिल्हा न्यायालयातील अधीक्षक होते. काकाही न्यायालयात कामाला होते. काका आणि वडिलांची चर्चा ऐकून शेट्टी यांना आपणही जजसाहेब बनावे, असे वाटे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही सुरू झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २००८ मध्ये मुंबईत मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्यांची लिपिक म्हणून निवड झाली. २००९ मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी एलएल.बी.ला प्रवेश घेतला. सकाळी ७ ते १० महाविद्यालयाचा अभ्यास आणि नंतर कार्यालयीन काम असे करत त्यांनी विधी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत शेट्टी यांनी प्रयत्न केला; पण तो असफल ठरला. पुन्हा एकदा जोमाने अभ्यास सुरू केला. २०१७ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला ते बसले आणि दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदावर त्यांची निवड झाली.

लोकल प्रवासादरम्यान अभ्यास
विश्‍वनाथ शेट्टी राहायला बदलापूरला आणि विक्रोळी न्यायालयात कामाला असल्याने त्यांना अभ्यासासाठी फार वेळ मिळायचा नाही. ते सांगतात, की सकाळी ५ ते ७ अभ्यास आणि नंतर कार्यालयीन कामातून जेवढा वेळ काढता येईल तेवढा अभ्यास करायचो. सकाळी लोकल प्रवासात मोबाईलच्या साह्याने अभ्यास करायचो. प्रवासादरम्यान यू-ट्युबवरचे व्हिडीओ पाहून अभ्यास केला. पत्नी सविता हिने कुटुंबाची जबाबदारी पेलत मला अभ्यासासाठी वेळ दिला. बदलापूरमधील शारदा अभ्यासिकेचा खूप उपयोग झाला. जिल्हा न्यायाधीश एम. जे. मिरजा यांचेही मार्गदर्शन लाभले, असे शेट्टी म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court clerk to judge vishwanath shetty