दापोडीतील सोसायटीधारकांचे रखवालदाराला ‘सुरक्षा’ कडे

दापोडीतील सोसायटीधारकांचे रखवालदाराला ‘सुरक्षा’ कडे

पिंपरी - ज्याच्या भरवशावर आपले घरदार सोडून निर्धास्त राहतो तो म्हणजे रखवालदार. अत्यल्प मोबदल्यावर राहणारा हा घटक कायमच उपेक्षित असतो. मात्र दापोडी येथील विशाल कॉम्प्लेक्‍समधील रहिवाशांनी आपल्या रखवालदाराचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली. शिवाय अनोखा आदर्शही समाजासमोर ठेवला आहे.

या सोसायटीत आठ वर्षांपासून लक्ष्मण थापा (मूळ नेपाळ) रखवालदार आहे. प्रत्येकाच्या हाकेला त्वरित प्रतिसाद देणारा, अशी त्याची आणखी एक ओळख. २५ नोव्हेंबरला दुपारी लक्ष्मणच्या छातीत दुखायला लागले. तो सोसायटीतीलच डॉ. रत्नाकर इनामदार यांच्या दवाखान्यात गेला. तपासणीवेळी समजले की त्याला हृदयविकाराचा धक्का बसला आहे. ही वार्ता समजल्यावर सोसायटीचे पदाधिकारी तातडीने जमा झाले. नंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने लगेच लक्ष्मणला डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. आवश्‍यक सर्व तपासण्या केल्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. तसेच यासाठी किमान दोन लाख रुपये खर्च येईल, असेही सांगितले.

आर्थिक परिस्थिती बिकट, त्यातच कोणतीही कागदपत्रे जवळ नसल्याने शासकीय मदत मिळणार नव्हती. कमावत्या पुरुषावर हे संकट आल्याने त्याचे कुटुंब हवालदिल झाले. परंतु सोसायटीतील सर्व सभासदांनी धीर दिला. नंतर सोसायटीतील डॉ. इनामदार यांच्यासह सभासद रघुनंदन नायर, बाळासाहेब कोबल, राहुल चोरडिया, नवीन बन्सल यांनी चर्चा केली. सर्व रहिवाशांना मदतीचे आवाहन केले आणि दोन दिवसांत दोन लाख रुपये जमा झाले. 

लक्ष्मणवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तो पाच डिसेंबरला पुन्हा कामावर आला आणि कुटुंबासह सर्व रहिवाशांचे चक्क पाय धरले. मरणाच्या दाढेतून सुटका होऊन परत आल्याबद्दल सभासदांनाही आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com