वाहनातील इंधनगळती दिसणार डॅशबोर्डवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

चारचाकी वाहनामधून चुकून इंधनगळती होत असेल, तर ते चालकाच्या लक्षात येत नाही. परंतु, तसे होत असल्यास संदेश तुम्हाला वाहनाच्या डॅशबोर्डवर किंवा मोबाईलवर मिळाला तर..., हो तसे होणे आता शक्‍य आहे. याचा प्रकल्प रक्षित अय्यंगार या नववीच्या विद्यार्थ्याने तयार केला असून, केंद्र सरकारच्या दिल्ली येथील ‘इन्स्पायर ॲवॉर्ड-मानक’ प्रदर्शनात तो प्रकल्प मांडण्याची संधी त्याला मिळाली.

पिंपरी - चारचाकी वाहनामधून चुकून इंधनगळती होत असेल, तर ते चालकाच्या लक्षात येत नाही. परंतु, तसे होत असल्यास संदेश तुम्हाला वाहनाच्या डॅशबोर्डवर किंवा मोबाईलवर मिळाला तर..., हो तसे होणे आता शक्‍य आहे. याचा प्रकल्प रक्षित अय्यंगार या नववीच्या विद्यार्थ्याने तयार केला असून, केंद्र सरकारच्या दिल्ली येथील ‘इन्स्पायर ॲवॉर्ड-मानक’ प्रदर्शनात तो प्रकल्प मांडण्याची संधी त्याला मिळाली.

पिंपरीतील येथील एचए स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात तो रक्षित शिकत आहे. त्याला विविध प्रकारचे लोकोपयोगी, विज्ञानावर आधारित संशोधन प्रकल्प तयार करण्याची आवड आहे. वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सहावीत असताना प्रोजेक्‍टर, मोबाईल लेझर, आठवीत त्याने हायब्रीड सोलर ग्रास कटर तयार केले होते. जिल्हा परिषदेच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. या वेळेस त्याने ‘चारचाकी गाडी इंधनगळती दर्शक’ प्रकल्प तयार केला.

रक्षित म्हणाला, ‘‘आमच्या कारमधून इंधनगळती झाली होती. त्यावरून मला इंधनगळती दर्शकाची कल्पना सुचली. या प्रकल्पांतर्गत मी सेंसर तयार केले आहेत. गाडीमधून गळती झाल्यास त्याआधारे डॅशबोर्डवर वाहनचालकाला समजते. तसेच वाहन आपोआप बंद पडते. आपण गाडीपासून दूर असल्यास आणि इंधनगळती होत असली तरी, आपल्याला मोबाईलवर त्याबाबत समजू शकते.’’ तो म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या देशभरातील विविध राज्यांमधून ८५० तर महाराष्ट्रामधून ६५ प्रकल्पांची ‘इन्स्पायर ॲवॉर्ड-मानक’ प्रदर्शनासाठी निवड झाली होती. त्यामध्ये माझ्याही प्रकल्पाचा समावेश होता.’’ मुख्याध्यापक ए. ह. बुरसे, उपमुख्याध्यापक सुनील शिवले, पर्यवेक्षिका वर्षा भोपाळे, आशा बनसोडे यांनी त्याचे कौतुक केले. श्‍वेता नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

दिल्ली आयआयटी येथे हे प्रदर्शन झाले. हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. भविष्यात विज्ञान शाखेत जाऊन माझी ऑटोमोबाईल इंजिनिअर व्हायची इच्छा आहे.
- रक्षित अय्यंगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the Dashboard to see the fuel leak in the vehicle

टॅग्स