मजुरांच्या मुलांच्या स्वप्नांना पंख 

सुवर्णा चव्हाण
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे - मोलमजुरीमुळे कोमलच्या आई-वडिलांना सतत फिरावे लागायचे. कुठेतरी यामुळे तिचे शिक्षणही मागे राहत होते. परिस्थितीने तिच्या स्वप्नाला जणू ब्रेक लावला होता. बांधकामाच्या ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या ‘डे-केअर सेंटर’ मध्ये कोमलला आसरा मिळाला अन्‌ तिच्या स्वप्नांना पंखही. डे-केअर सेंटरमध्ये तिचे शिक्षण पुन्हा सुरू झाले आणि आज ती एका महाविद्यालयात डिप्लोमा करतेय.

कोमलसारख्या अनेक मुलांच्या आयुष्याला आधार मिळालाय तो ‘तारा मोबाईल क्रेशेस संस्थे’च्या ‘डे-केअर सेंटर’मुळे. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी ही संस्था. बांधकाम मजुरांना सतत स्थलांतर करावे लागते. यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा मुलांना असुरक्षित वातावरणापासून दूर नेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्याचे काम संस्था करीत आहे. 

संस्थेच्या व्यवस्थापिका श्रुती पुरंदरे म्हणाल्या, ‘‘पालकांचे समुपदेशन करून त्यांचा मुलांशी पुन्हा संवाद निर्माण करण्याचे काम संस्थेतील प्रतिनिधी करत आहेत.’’

पुण्यात १५ ठिकाणी ‘डे-केअर सेंटर’
‘तारा मोबाईल क्रेशेस संस्थे’चे शहरात १५ ठिकाणी डे-केअर सेंटर आहेत. जन्मलेल्या मुलापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा सांभाळ या डे-केअर सेंटरमध्ये केला जातो. हे सेंटर बांधकामाच्या ठिकाणी उभारण्यात आले असून, त्यामुळे पालकांनाही मुलांवर लक्ष ठेवता येत आहे. कोंढवा, हडपसर, हिंजवडी, पाषाण, वाघोली, पिंपरी-चिंचवड, उंड्री, वारजे आदी ठिकाणी हे सेंटर आहेत.

डे-केअर सेंटरमध्ये
मुलांना सकाळचा नाश्‍ता व जेवण शैक्षणिक वर्ग  
करमणुकीचे कार्यक्रम 
कलाकुसरीचे प्रशिक्षण
मुलींसाठी वसतिगृहाची सोय

मजुरांच्या मुलांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन, अध्ययनासाठी विविध संधी ते अर्थसाह्यापर्यंत त्यांना मदत करण्यात येते. निवडक मुलांना आम्ही वसतिगृहातही प्रवेश मिळवून देतो. संस्थेच्या प्रयत्नामुळे आता मुले शिक्षणाकडे वळू लागली आहेत.
- श्रुती पुरंदरे, व्यवस्थापक, तारा मोबाईल क्रेशेस संस्था

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Day Care Center for labour child