"स्प्रेड द पॉझिटिव्हिटी' हा ध्यास तिचा 

नीला शर्मा 
Wednesday, 22 April 2020

"स्प्रेड द पॉझिटिव्हिटी'हा ध्यास असल्याने देवकीने या जिवंत कथांची झळाळी समाज माध्यमांतून जगभर पोचवली.जगातील सर्वांत गरीब देशात तिनं दीड वर्ष राहून तेथील सर्वसामान्यांमधील सकारात्मकतेची श्रीमंती शोधली

जगातील सर्वांत गरीब देशात तिनं दीड वर्ष राहून तेथील सर्वसामान्यांमधील सकारात्मकतेची श्रीमंती शोधली. आत्यंतिक हलाखीची स्थिती, दहशतवादी कारवाया आदींमुळे चॅड या देशातील जनतेची घुसमट आणि तरीही अनेकांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, यशाकडे वाटचाल, आशावाद तिने टिपला. "स्प्रेड द पॉझिटिव्हिटी' हा ध्यास असल्याने देवकी एरंडेने या जिवंत कथांची झळाळी समाज माध्यमांतून जगभर पोचवली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आधुनिक काळात अवघं मिळून एक गाव बनलं असल्याचं किंवा जग जवळ आल्याचं बोललं जात असलं तरीही अनेक भूभाग अजूनही परिघाबाहेर आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांची चर्चा राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांसंदर्भात केली जाते, मात्र, चॅडसारखे देश कुणाच्या खिजगणतीतही नसतात. देवकी एरंडे म्हणाली, ""आफ्रिका खंड म्हटला की, बहुतांश लोकांना दक्षिण आफ्रिकाच वाटते. पण तेथे 54 देश आहेत. त्यांपैकी मध्य उत्तरेकडचा चॅड हा देश लोकांना माहीत नसतो. मोजक्‍या लोकांना तो ठाऊक असला तरी "जगातील सर्वाधिक गरीब देश' म्हणूनच. त्यातही तिथे चालणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे तर तिथली असुरक्षितता, अनिश्‍चितता हा नित्याचा ऐरणीवरचा प्रश्‍न. तिथे जायची संधी मी स्वीकारल्यावर परिचितांनी परावृत्त करायचा प्रयत्न केला. पण मला वाटलं की, अशा देशातील लोकजीवन जवळून पहावं. नंतर त्याबाबतीत काही करता आलं तर करावं. मी तिथे गेले. रस्त्यावरील विक्रेता ते सधन व्यक्तींपर्यंत शंभरहून अधिक लोकांशी बोलून मी त्यांचा काळोखातून उजेडाकडे जाण्याचा प्रवास जाणून घेतला. या सगळ्यांनी निराशेतून बाहेर येत प्रयत्नशील राहणं पत्करलं होतं. दीड वर्षाच्या वास्तव्यात शंभरपेक्षा जास्त मुलाखती मी घेतल्या.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देवकीने असंही सांगितलं की, फेसबुकवर "ह्युमन्स ऑफ एन्‌ जामेना' हे विशेष पान यासाठी मी तयार केलं. जामेना ही तिथली राजधानी. मी भेटले त्या माणसांच्या आयुष्याला कशामुळे कलाटणी मिळाली व नंतर त्यांनी कसं मार्गक्रमण केलं हे मी केवळ एका परिच्छेदात लिहायचे. छायाचित्रं जोडायचे. अवतीभवती प्रचंड वाईट घटना घडत असतानाही छोट्या-छोट्या गोष्टींमधून ऊर्जा कशी मिळवायची, चांगलं कसं शोधायचं, कसं निर्माण करायचं ही या माणसांची गुणवत्ता जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या देशाची प्रतिमा उंचावली जावी यासाठी माझ्या परीने धडपड केली. देशादेशांतील आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे होण्यासाठी काही माणसं, गट, संस्था प्रयत्न करतात. त्यांना असे संदर्भ उपयुक्त ठरतात. मी फ्रेंच भाषा व संस्कृतीचं शिक्षण घेतलं. त्यातूनच या कामासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी मला विचारणा झाली आणि मी ही संधी घेतली, काही करू शकले याचं समाधान मला पुढच्या कामगिरीसाठी बळ पुरवेल. लवकरच मी माली या ठिकाणी जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devki obsession spread the positivity