प्रज्ञाचक्षू प्रांजलची ‘आयएएस’पर्यंत भरारी

धनश्री बागूल
रविवार, 7 जानेवारी 2018

जळगाव जिल्ह्यातील वडजी (ता. बोदवड) येथील प्रांजल पाटील या प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनीने अंधत्वावर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण केली. अंध असूनही आयएएस होणारी ती भारतातील दुसरी महिला ठरली.

जळगाव जिल्ह्यातील वडजी (ता. बोदवड) येथील प्रांजल पाटील या प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनीने अंधत्वावर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण केली. अंध असूनही आयएएस होणारी ती भारतातील दुसरी महिला ठरली.

प्रांजल हिचे माहेर बोदवड तालुक्‍यातील वडजीचे. सध्या ती उल्हासनगर येथे राहते. प्रांजलला लहानपणी कमी दिसायचे. तिच्या डोळ्यांची तपासणी केली असता डॉक्‍टरांनी नजर कमी आहे, बाराव्या वर्षांनंतर अंधत्व येईल, अशी भीती व्यक्त केली. तेव्हाच प्रांजलला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा निर्धार आई-वडिलांनी केला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. दुसरीत असताना विद्यार्थ्याने डोळ्यांवर पेन्सिल मारल्याने प्रांजलचा एक डोळा अधू झाला. तिसरीत असताना चाळीसगाव येथे कुटुंबीयांसमवेत लग्नाला गेली असताना प्रांजल आजारी पडली. आजारात दुसरा डोळाही अधू झाला.

प्रांजलच्या अंधत्वाने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले; परंतु हार न मानता प्रांजलला धीर देत शिकवले. तिचे चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दादरच्या मेहता अंध शाळेत झाले. 

प्रांजलने दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर चांदीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळवून कला शाखेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. नंतर झेव्हियर महाविद्यालयातून कला शाखेत पदवी मिळविताना विद्यापीठात प्रथम येण्याची कामगिरी केली. आत्मबल वाढल्यानंतर प्रांजलने वडिलांकडे आयएएस होण्याची इच्छा व्यक्त केली. कसून तयारी केली. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून ‘एमफिल’ही केले. ‘आयएएस’च्या परीक्षेत ती १२४ व्या रॅंकने उत्तीर्ण झाली. 

पतीने दिली साथ
ओझरखेडा येथील केबल व्यावसायिक कोमलसिंग पाटील यांनी प्रांजलला अंध असतानाही तिच्याशी विवाह केला. आपल्या यशात आई, वडील, पती, मित्र, नातेवाईक आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. वसतिगृह, क्‍लासमधील सुविधांमुळे यश मिळवता आल्याचे तिने सांगितले.

Web Title: dhanashri bagul article on pranjal patil