कुटुंबासह गावाचे नाव पोचवले आकाशात!

मुंबई - विमानासमवेत कॅप्टन अमोल यादव.
मुंबई - विमानासमवेत कॅप्टन अमोल यादव.

ढेबेवाडी - ‘त्याच्या प्रत्येक स्वप्नातील ठाम विश्‍वास आणि जबर आत्मविश्‍वास आम्ही हेरला. ध्येयाकडे झेपावण्यासाठी फडफडणाऱ्या त्याच्या पंखांना प्रोत्साहनाचे बळ देत भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलो. त्याच्या इतकाच आमचाही त्याच्या भरारीवर विश्‍वास होता आणि आज त्याने तो सार्थही ठरविला. अमोलने आमचे, कुटुंबाचे आणि गावाचे नाव आकाशात पोचविले,’ असे भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे आई-वडील भरभरून सांगत होते.

कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या सहा आसनी विमानाची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच नोंदणी केली असून, आता लवकरच हे विमान आकाशात झेपावणार आहे. एका जिद्दी, कर्तबगार, ध्येयवेड्या युवकाची आणि त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेल्या अख्ख्या कुटुंबाची १९ वर्षांची तपश्‍चर्या आता फळाला आल्याने यादव परिवारासह गावकऱ्यांना आनंदाने आभाळ ठेंगणे झाले आहे. ढेबेवाडी विभागातील सळवे हे यादव कुटुंबीयांचे मूळगाव आहे. अमोल यांच्या आजोबांनी ९० वर्षांपूर्वी नोकरी-व्यवसायानिमित्ताने गाव सोडले आणि हे कुटुंब तिकडेच स्थायिक झाले. सध्या अमोल यांचे वडील शिवाजी यादव, चुलते व बंधू असे एकत्र कुटुंब मुंबईत राहतात. कामाचा व्याप असला तरी गावच्या मातीशी जोडलेली नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही. वर्षातून दोन-तीन वेळा यादव कुटुंबिय गावाकडे येतात. लाडक्‍या लेकाच्या आभाळाएवढ्या कामगिरीबद्दल ‘सकाळ’कडे आपल्या भावना व्यक्त करताना वडील शिवाजी यादव आणि आई सौ. माधवी यांचा ऊर आभिमानाने भरून आला होता. ते म्हणाले, ‘काय सांगू आणि कुठून सुरवात करू हेच समजेनासे झाले आहे.

आमच्यासाठी अजूनही तो खेळण्यातल्या विमानाशी मनसोक्त खेळत जिज्ञासू वृत्तीने त्याच्या अंतरंगात डोकावणारा लहानपणीचा तो अमोलच आहे. वयोमानाने मर्यादा आहेत नाहीतर आज आम्ही त्याला उचलून खांद्यावर, कडेवर घेऊन आनंदाने नाचलो असतो. आकाशाला गवसणी घालणारे त्याचे स्वप्न आम्ही लहानपणीच त्याच्या नजरेतून टिपले होते.

तिथपर्यंत पोचण्यासाठीच्या प्रवासात आम्ही फक्त प्रोत्साहन आणि लागेल ती मदत देऊन त्याच्या सोबत राहिलो. जिद्द आणि अथक धडपड त्याचीच होती. अमोल यांनी पायलटचे शिक्षण अमेरिकेत घेतले आहे.

प्रशिक्षणादरम्यान त्याने आमच्याकडे आकाशात झेपावणाऱ्या छोट्या विमानासाठी हट्ट धरला होता. मोठी रक्कम मोजून आम्ही तो हट्ट पूर्णही केला. त्याने हे महागडे विमान त्यावेळी उलगडून, खोलून पाहिले होते. खरे तर ही मोडतोड नव्हती तर एका मोठ्या स्वप्नाकडे झेपावण्यासाठीची जणू तयारीच होती, हे आज त्याने दाखवून दिले. त्याच्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा आम्ही कधीही कोंडमारा होऊ दिला नाही. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्यभराची पुंजी ओतली.

त्यावेळी आम्ही जणू खोल अंधाऱ्या विहिरीत पैसे टाकत होतो. अपेक्षा धुसर दिसत होत्या. लोक आम्हाला वेडे समजून हसत होते. परंतु, आमच्या मुलाच्या कामावर त्याच्या इतकाच आमचाही पूर्ण विश्‍वास होता. दागिने, फ्लॅट, मालमत्ता विकून पैसा उभा केला. भाड्याच्या घरात राहण्यास गेलो. भाडे थकल्याने काहीवेळा साहित्य रस्त्यावरही आले. मात्र, उमेद खचू दिली नाही. पूर्वीपासूनच आम्हा भावंडांचे एकत्र कुटुंब आहे. आपला-परका भेद येथे अजिबात नाही. सर्वजण पाठीशी ठाम राहिलो. अमोल यांनीही पायलट म्हणून काम करत मिळणारी पुंजी विमान निर्मितीत घातली. दोन प्रयत्न अयशस्वी झाल्याने जबर आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, तरीही प्रयत्न सुरूच राहिले. त्यामुळेच आम्ही राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आता स्वप्न सत्यात उतरविणाऱ्या तिसऱ्या विमानाने जन्म घेतला आहे.’

‘‘ अपयशाने निराश न होता मोठ्या जिद्दीने सुरूच ठेवलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. प्रचंड आव्हाने पेलत आता नजरेच्या टप्प्यात आलेल्या एका मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी अमोलसह त्याचे भाऊ रश्‍मीकांत, प्रशांत आणि आमचे आख्खे कुटुंब सध्या रात्रीचा दिवस करीत आहे.’’
-शिवाजी यादव, कॅप्टन अमोल यादव यांचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com