पारंपरिक रूढींना फाटा देत वृद्धाश्रमात ‘डोहाळे जेवण’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

प्राध्यापक दाम्पत्याचा अनोखा उपक्रम ः- आजी-आजोबांना कपडे वाटप

धुळे - बाळाची चाहूल लागल्यानंतर सातव्या महिन्यात गर्भवतीचे डोहाळे जेवण केले जाते. हौसमौज व आर्थिक परिस्थितीनुसार कार्यक्रमाची रूपरेषाही आखली जाते. मात्र हौसेच्या नावाने कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी न करता त्याच पैशातून गरजवंतांना मदत देण्याचा मनोदय धुळ्यातील प्रा. सुजाता पाटील यांनी व्यक्‍त केला. त्यांच्या विचारांना कृतीची जोड देत पती प्रा. कुणाल पाटील व कुटुंबीयांनीही वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत ओटीभरण कार्यक्रम केला. 

संस्कारांची जाणीव व्हावी
घरात नवीन बाळ येणार म्हटले, की सर्वांना आनंद होतो. मात्र त्याचवेळी आजी-आजोबांना वृद्धाश्रमाची वाट दाखविली जाते. पण हेच आजी-आजोबा संस्कार, सुविचारांचे वाहक असतात. आताच्या पिढीला त्यांचे महत्त्व आणि नातवंडांसाठी त्यांची गरज लक्षात यावी, या उद्देशाने वृद्धाश्रमातच कार्यक्रम घेतल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. उपक्रमासाठी सासरे सुरेश वामनराव पाटील, सासू वसुमती पाटील, आई रत्ना पाटील, वडील नागराज पाटील, राहुल पाटील, नयना पाटील, अर्चना पाटील, अनिता पाटील यांनी सहकार्य केले. 

गायली भजने अन्‌ दिल्या टिप्स
ओटीभरण कार्यक्रमात परिवारातील मोजक्‍याच चार-पाच व्यक्‍तींना घेऊन गेल्यानंतर वृद्ध आजी-आजोबांच्या सान्निध्यात कार्यक्रम झाला. ज्येष्ठ महिलांनी डोहाळे गीत गाऊन प्रा. सुजातांना आशीर्वाद दिले. यावेळी सर्व आजी-आजोबांना जेवणासह साड्या व कपडेही देण्यात आले. घरात नवीन पाहुण्याच्या आगमनावेळी होणारा आनंद वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी अनुभवला. सर्वांनी नाचगाणे म्हणत आनंद व्यक्‍त केल्याने वृद्धाश्रमात वातावरण बदलले, अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला असल्याचे व्यवस्थापक धीरज यांनी सांगितले.

प्रत्येकवेळी वाढदिवस किंवा पुण्यस्मरणाला वृद्धाश्रमात येऊन काही जण आम्हाला मदत देतात. ते फक्‍त फोटोपुरतेच असते का? आमच्यासाठी आपले असे कोणी नसेल का? असा प्रश्‍न आम्हाला नेहमी पडतो. मात्र आजच्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतल्याने मन भरून गेले.
- सुषमा कुलकर्णी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhule news programe in old age home